चिपळूण तालुक्यातील कोकरे गावात दहावीतील विद्यार्थीनीवर अत्याचार, दोनजण अटकेत

सावर्डे (चिपळूण), दि. १६ (वृत्तसंस्था): रत्नागिरी जिल्हा चिपळूण तालुक्यातील सावर्डे नजीक कोकरे गावात शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला निर्जनस्थळी बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवत दोघांना अटक केली असून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर तालुक्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान चिपळूण तालुक्यातील कोकरे गावातील या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात गावातील तरुणांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा तपास सावर्डे पोलीस करत असून पीडित अल्पसंख्याक समाजातील असल्याने सामाजिक तणाव हाताळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्रकृती गंभीर असल्याने पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी आरोपी आणि पीडित मुलीची ओळख झाली. यावेळी दोघांनीही आपले मोबाईल नंबर एक्सचेंज केले होते. आरोपी हा मुंबईमध्ये मंडप डेकोरेटरचे काम करतो. दोनच दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्यावेळी त्याने पीडित मुलीला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्याने अल्पवयीन असलेल्या मुलीवरती अत्याचार केले. ही घटना गुरुवारची असल्याची माहिती आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून आणखीन तपास सुरू आहे. पीडित मुलीवर ती सध्या उपचार सुरू आहेत. सध्या संपूर्ण प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका बंद घराची चावी खिडकीतून मिळवून सदरचा गुन्हा घडलेला आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये हा प्रकार घडला त्या व्यक्तीचा संबंध याच्याशी काही आहे किंवा नाही? याचा तपास सुरू आहे. ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळी या घरामध्ये राहणारी व्यक्ती ही खेड इथे क्रिकेट खेळायला गेलेली होती. त्यामुळे या प्रकरणी आणखी तपास केला जाईल. त्यानंतरच आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारानंतर गावात संतापाचे वातावरण आहे. घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. गावात शांतता राखण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणाचा तपास सावर्डे पोलीस करत आहेत.

आणखी वाचा