छत्रपती संभाजीनगर, दि. ६ : कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ हे जनसंवाद अभियान राबविणार असून शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था आणि लोकशाही संस्थांशी संबंधित प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा संस्थापक अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत केली.
दिपके म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर आधारित संघटन म्हणून सीजेपी काम करणार आहे. शिक्षण आणि बेरोजगारी हे आगामी काळातील प्रमुख मुद्दे असतील. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत त्यांनी, “देशातील तरुणांनी अन्यायाविरोधात आवाज उठवून मोठा विजय मिळवला,” असा दावा केला.
देशातील शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याची टीका करत ते म्हणाले, “आज प्राथमिक शिक्षणासाठीही पालकांना मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे सरकारी शाळा सक्षम करून दर्जेदार शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करणे आवश्यक आहे.”
न्यायव्यवस्थेवर भाष्य करताना त्यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप केला. माध्यमांनीही निष्पक्ष भूमिका घेत सर्व घटकांचा आवाज मांडला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राजकीय पक्षांवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे सांगत त्यांनी वारंवार होणाऱ्या पक्षांतरांवर आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच, निवडणूक आयोगासह विविध लोकशाही संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी पक्षाऐवजी दबावगट म्हणून काम करण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले. यावेळी संघटनेची नवी कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. अभिजीत दिपके अध्यक्ष, आशुतोष रांका व सौरव दास उपाध्यक्ष, अजिंक्य शिंदे संघटन प्रमुख, तर विजय रेड्डी मलांगी मीडिया समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
तसेच सोनम वांगचुक हे संघटनेचे मार्गदर्शक राहतील, असे सांगत देशभरातील पाच विभागांमध्ये संघटन विस्तार करून अधिकाधिक नागरिकांना या अभियानाशी जोडण्याचा निर्धार दिपके यांनी व्यक्त केला.








