महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 5 (जिमाका):-  सिंचनापासून ते पायाभूत सुविधापर्यंत, उद्योगापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत, तरुणापासून ते ज्येष्ठांपर्यंत, परदेशी गुंतवणूकीपासून ते झोपडपट्टी पुनर्विकासापर्यंत अशा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,  महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ, विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे, निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार गणेश नाईक, संजय केळकर, प्रताप सरनाईक, किसन कथोरे, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, तसेच आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, गीता जैन आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिकांचे आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, अमृताहूनही गोड असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानत ते म्हणाले, आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे. प्रधानमंत्री श्री.मोदी हे विश्वास, गती आणि प्रगती या तत्त्वावर विश्वास ठेवतात, त्यामुळे आज विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असून आजच्या दिवशी इंटरनल मेट्रो 29 कि.मी. ची सेवा सुरु होणार आहे. ठाण्याची वाहतूक कोंडी दूर होणार आहे. ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणी होत आहे. सध्याच्या फ्री वे ला छेडानगर ते ठाण्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे. ठाणे ते मुंबई प्रवास वेगवान होणार आहे. नवी मुंबई विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. सिडकोच्या नैना प्रकल्पात देखील मोठी पायाभूत सुरु आहे. सिडकोची ही टाऊनशिप मुंबईची शान वाढविणारी ठरणार आहे. प्रधानमंत्री यांच्या हस्ते ज्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन होते, ते सर्व प्रकल्प पूर्ण होतात. आज ज्या प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे, त्या सर्व प्रकल्पांचे लोकार्पण देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मेट्रो 3 चा पहिला टप्पा तसेच इतर विकास प्रकल्प यापूर्वी थांबविण्यात आले होते. त्या सर्व प्रकल्पांना या सरकारने चालना दिलेली आहे. मेट्रो 3 चा बीकेसी ते कुलाबा हा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार असून अटल सेतू, कोस्टल रोड असे मोठमोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. आज शुभारंभ झालेल्या मेट्रो 3 च्या माध्यमातून 20 लाख ठाणे व मुंबईकर प्रवास करणार आहेत असे सांगून या प्रकल्पाला अर्थसहाय्य दिलेल्या जपानच्या जायकाचे (Japanese International Co-opreration Agency) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले.
माय मराठी भाषेला मोदींजींनी अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा जगभरातील मराठी माणासांच्या माध्यमातून प्रधानमंत्री मोदींचे आभार मानतो. कारण आपल्या माय मराठी भाषेला मोदींजींनी अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे. माय मराठीची पूजा मोदींजींच्या हातून झाली आहे.
एमएमआर रिजन मध्ये खूप मोठया प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत. सगळ्यात महत्वाचे मुंबईची 40 कि.मी. लांबीची भूमिगत मेट्रो-3 ही आशियातील सर्वात मोठ्या मार्गिकेच्या आज पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदींजींच्या हस्ते होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की, ही ग्रीन मेट्रो आहे. पर्यावरणाला साथ देणारी, पर्यावरणाचे संवर्धन करणारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाची मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत.
ठाण्यात अंतर्गत रिंग मेट्रो या कामाचा भूमिपूजन होत आहे. यामुळे ठाण्यातील वाहतूक सुरळीत होणार आहे. लोकांचे जीवन सुकर होणार आहे. सगळ्यात महत्वाचे ईस्टर्न फ्री वे आता थेट ठाण्यापर्यंत येणार आहे. नैना हे अटल सेतू आणि नवीन विमानतळ मधील भाग येथील कामाचा शुभारंभ आणि ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ होत आहे. छत्रपती शिवाजी  महाराजांचे नमन करून आपल्या कार्याची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
100 दिवसांत सरकारने मोदींच्या नेतृत्त्वात विकासाची सेंच्युरी मारली  – उपमुख्यमंत्री अजित पवार
प्रास्ताविक भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांच्या तिसऱ्या इनिंगची सुरुवात देखील दमदार झाली आहे. दि.18 सप्टेंबर रोजी मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील त्यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत.  या 100 दिवसांत सरकारने मोदींच्या नेतृत्त्वात विकासाची सेंच्युरी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पहिल्या दोन इनिंगमध्ये म्हणजे त्यांच्या पहिल्या दहा वर्षात भारताच्या विकासाचा पाया मजबूत केला आहे. महाराष्ट्रातही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात दमदार विकास कामे होत आहेत. मोदींच्या स्वप्नातला भारत घडताना दिसत आहे.
पहिल्या 100 दिवसांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतले.  त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे वाढवण बंदर त्यासाठी जवळपास पाऊण लाख कोटी रुपयांचा निधी पंतप्रधानांनी दिला आहे. त्याचबरोबर अनेक वर्षापासून प्रत्येक मराठी माणसाची बहुप्रतिक्षित असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली आहे.  याचा अभिमान मला आणि माझ्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आहे, असे बोलून महाराष्ट्रासाठी असा अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल श्री.पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी पैठणी शाल, महाराष्ट्राची ओळख असलेला पैठणी फेटा तसेच ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची प्रतिकृती व ठाण्याच्या दुर्गेश्वरी मातेची प्रतिमा देवून स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदिका मानसी सोनटक्के यांनी केले.

आणखी वाचा