गुवाहाटी, दि. ३० : आयपीएल २०२६ हंगामात चेन्नई सुपर किंग्ससाठी एका युगाचा अंत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ‘यलो आर्मी’ म्हणून ओळखली जाणारी ही फ्रँचायझी यंदा प्रथमच महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय मैदानात उतरली आहे. त्यामुळे संघ नव्या बदलाच्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्सच्या यशात धोनी आणि रैना या जोडीचा मोठा वाटा राहिला आहे. ‘थला’ धोनी आणि ‘चिन्ना थला’ रैना या नावांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या या दोघांनी अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. त्यामुळे या दिग्गजांशिवाय मैदानात उतरलेली सीएसकेची टीम चाहत्यांसाठीही भावनिक क्षण ठरला आहे.
सुरेश रैनाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून धोनी हंगामाच्या सुरुवातीला संघासाठी उपलब्ध नसल्याने हा ऐतिहासिक बदल घडला आहे. यासोबतच रवींद्र जडेजाचाही संघात अभाव जाणवत आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडूंवर अवलंबून असणारी सीएसके आता तरुण खेळाडूंना संधी देण्याच्या धोरणाकडे वळली आहे.
आयपीएलमधील धोनीचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्याने २७८ सामने खेळत ५४३९ धावा केल्या असून १०० वेळा नाबाद राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तर सुरेश रैनाने २०० हून अधिक सामने खेळून ५५२८ धावा करत सीएसकेच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.
दरम्यान, आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने युवा खेळाडूंवर भर देत नवा संघ उभारला आहे. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन संघबांधणी करण्यात आली असून, नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देत फ्रँचायझी पुढील काळासाठी तयारी करत आहे.
या बदलामुळे सीएसकेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, ‘यलो आर्मी’ नव्या रूपात कशी कामगिरी करते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.








