दापोली, दि. ०९ (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट) ने एकहाती वर्चस्व प्रस्थापित करत दणदणीत विजय मिळवला आहे. गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या ६ पैकी ६ आणि पंचायत समितीच्या १२ पैकी १० जागांवर विजय मिळवत दापोली हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
या निवडणुकीत योगेश कदम यांच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी आणि उबाठा (ठाकरे गट) हे सर्व पक्ष एकत्र आले होते. मात्र सर्व पक्षांची एकत्रित ताकदही शिवसेनेसमोर अपुरी ठरली. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच ना. योगेश कदम व त्यांच्या पत्नी सौ. श्रेयाताई कदम यांनी प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या व प्रभावी प्रचारयंत्रणा उभी केली. प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांना थेट पाठबळ देत त्यांनी प्रचाराचे सूत्र स्वतः हातात घेतले होते.
भाजप व राष्ट्रवादीने उबाठासोबत केलेली आघाडी ही बंद दरवाजामागे झाली होती. ही युती कार्यकर्त्यांना मान्य नव्हती. अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र प्रचार करताना दिसले नाहीत. परिणामी प्रचारात सातत्याचा अभाव जाणवला. दुसरीकडे शिवसेनेचा प्रचार संघटित, नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण राहिला.
दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. अर्चना बोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १८ टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर प्रत्येक गट व गणनिहाय मतमोजणी करण्यात आली. दुपारी सुमारे २ वाजता निकाल स्पष्ट झाले.
जिल्हा परिषद गटांचे निकाल
जालगाव जिल्हा परिषद गट
या गटाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांनी भाजपचे विद्यमान सरपंच अक्षय फाटक यांचा पराभव केला.
किशोर देसाई (शिवसेना) – ८,६६३ मते
अक्षय फाटक (भाजप) – ६,१२४ मते
किशोर देसाई हे २,५३९ मतांनी विजयी झाले.
दाभोळ जिल्हा परिषद गट
साधना महाजन (शिवसेना) – ७,४५३ मते
स्मिता जावकर (भाजप) – ४,२६५ मते
साधना महाजन ३,१८८ मतांनी विजयी झाल्या.
केळशी जिल्हा परिषद गट
नितीन दुर्गवले (शिवसेना) – ६,८५५ मते
गुणाजी गावणूक (उबाठा) – ३,८२५ मते
नितीन दुर्गवले यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.
कोळबांद्रे जिल्हा परिषद गट
प्रभाकर गोलांबडे (शिवसेना) – ८,६३२ मते
राजाराम रसाळ (उबाठा) – ३,१४४ मते
प्रभाकर गोलांबडे ५,४८८ मतांनी विजयी झाले.
पालगड जिल्हा परिषद गट
मिनाक्षी शेडगे (शिवसेना) – ७,६९८ मते
नेहा जाधव (राष्ट्रवादी) – ४,५८१ मते
शेडगे ३,११७ मतांनी विजयी झाल्या.
हर्णै जिल्हा परिषद गट
ऐश्वर्या धाडवे (शिवसेना) – ६,२८९ मते
शीतल जाधव (राष्ट्रवादी) – ५,२०८ मते
ऐश्वर्या धाडवे १,०८१ मतांनी विजयी झाल्या.
पंचायत समिती निकाल (महत्वाचे)
केळशी – संदीप चिखले (शिवसेना) विजयी
जुईकर मोहल्ला – उन्मेष राजे (शिवसेना) विजयी
दाभोळ – नम्रता तोडणकर (शिवसेना) विजयी
बुरोंडी – अंकिता घुबडे (शिवसेना) विजयी
पांगारी तर्फे हवेली – नरेश घरटकर (शिवसेना) विजयी
कोळबांद्रे – ममता शिंदे (शिवसेना) विजयी
पालगड – राजेंद्र फणसे (शिवसेना) विजयी
खेर्डी – सुचिता महाडीक (शिवसेना) विजयी
टेटवली – निलेश शेठ (शिवसेना) विजयी
गिम्हवणे – सुवर्णा खळे (शिवसेना) विजयी
भाजप व राष्ट्रवादीला केवळ दोन गणांमध्ये यश मिळवता आले.
या निकालातून स्पष्ट झाले आहे की दापोली तालुक्यात योगेश कदम यांचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे. विरोधी पक्षांची एकत्रित आघाडीही शिवसेनेच्या संघटनशक्तीपुढे टिकू शकली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर पूर्ण वर्चस्व मिळवत शिवसेनेने दापोलीत आपला बालेकिल्ला कायम राखला आहे.
या निकालामुळे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी दापोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.







