दापोली शहरात महास्वच्छता अभियान : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

दापोली, दि. ०३ (प्रतिनिधी): डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक विचारांना पुढे नेत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता दापोली शहरात महास्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानात दापोली शहरातील पंचायत समिती कार्यालय परिसर, प्रांत कार्यालय परिसर, दापोली तहसीलदार कार्यालय परिसर तसेच भूमी अभिलेख कार्यालय परिसरात व्यापक स्वरूपात स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणांवरील साचलेला कचरा, प्लास्टिक व इतर टाकाऊ साहित्य संकलित करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमात सुमारे चार टन कचरा जमा करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या महास्वच्छता मोहिमेत दापोली तालुक्यातील श्रीसमर्थ बैठकीतील सर्व श्रीसदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचबरोबर दापोली शहरातील अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनीही श्रमदान करत स्वच्छतेचा संदेश दिला. सहभागी सर्वांनी ‘स्वच्छ दापोली, सुंदर दापोली’ हा संकल्प प्रत्यक्ष कृतीतून साकार केला.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी राबविण्यात येणारे सामाजिक, पर्यावरणपूरक व जनजागृतीपर उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. या महास्वच्छता अभियानामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली असून भविष्यातही अशा उपक्रमांना सातत्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

आणखी वाचा