चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – ना. एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ३ : चिपळूणच्या भवितव्याचा निर्णय करणारी ही निवडणूक असून विकास हाच आमचा अजेंडा आहे. चिपळूणच्या उर्वरित विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा ठाम शब्द उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत दिला. तुमचं मत म्हणजे विकासाला मत आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

सभेच्या सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर भाजप व शिवसेना महायुतीचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. ना. शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना तसेच उपमुख्यमंत्री म्हणूनही आपण कार्यकर्ता म्हणूनच काम करीत आहोत. कार्यकर्त्यांच्या बळावरच शासन चालते आणि कार्यकर्त्यांच्या विजयासाठीच आपण चिपळूणमध्ये आलो आहोत.

कोकणाच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून कोकणात ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. कोकणातील वाया जाणारे पाणी अडवण्यासाठी मोठे प्रकल्प राबवले जातील. धरण दुरुस्ती, भूस्खलनग्रस्त भागात संरक्षक भिंती उभारणे तसेच नागरी सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, लखपती दीदी योजना, शेतकरी सन्मान योजना, युवकांसाठी विविध योजना तसेच आरोग्य आपल्या दारी या सर्व योजना कदापि बंद होणार नाहीत, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना आर्थिक मदत देण्यात आली असून ही योजना लोकांचा जीव वाचवण्यासाठीच वापरली जात आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला. गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनीही कार्यकर्त्यांच्या ताकदीवर विजय निश्चित असल्याचे सांगितले. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी चिपळूणमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

शेवटी ना. एकनाथ शिंदे यांनी, “मी एकदा शब्द दिला की मागे फिरत नाही,” असे सांगत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

आणखी वाचा