सावर्डे, दि. २ (प्रतिनिधी) : कोकणातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या श्री विठ्ठलराव जोशी अभिमत विद्यापीठ (विशिष्ट श्रेणी अंतर्गत) या कोकणातील पहिल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक विद्यापीठाचा उद्घाटन सोहळा मंगळवार, दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता डेरवण-सावर्डे येथील एस.व्ही.जे.सी.टी. संकुलात आयोजित करण्यात आला आहे. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी-२०२०) अनुरूप बहुविषयक, कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख शिक्षण व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने हे विद्यापीठ कार्यरत राहणार आहे. आधुनिक शिक्षणासोबत भारतीय ज्ञानपरंपरा, संशोधन, नवोपक्रम आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख विश्वस्त विकास वालावलकर यांनी दिली.
विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने या विद्यापीठात अवकाशशास्त्र, सेंद्रिय शेती, दर्शनशास्त्र, वेदाध्ययन, क्रीडा, बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, मानसिक आरोग्य, डेटा सायन्स आणि ड्रोन तंत्रज्ञान यांचा समावेश असलेले अनेक अभिनव अभ्यासक्रम प्रस्तावित करण्यात आले आहेत.
यामध्ये बी.एस्सी. स्पेस सायन्स, बी.एस्सी. नॅचरल फार्मिंग विथ ए.आय., बी.एस्सी. सायकोलॉजिकल अँड स्पिरिच्युअल हेल्थ, बी.एस्सी. बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन विथ ए.आय., बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, एम.एस्सी. क्लिनिकल अँड काउन्सेलिंग सायकॉलॉजी, एम.एस्सी. ॲडव्हान्स बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन तसेच बी.ए. आणि एम.ए. दर्शनशास्त्र (आयकेएस व संस्कृत) यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याशिवाय प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी, ऑनर्स आणि संशोधन पदवीपर्यंत मल्टिपल एंट्री-एक्झिट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळ्यात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, विद्यापीठ गीताचे प्रकाशन आणि विद्यापीठाच्या भावी शैक्षणिक वाटचालीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र राज्य एनईपी-२०२० सुकाणू समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन करमळकर, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार तसेच टाटा मेमोरियल सेंटरचे माजी शिक्षण संचालक डॉ. श्रीपाद बाणावली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोकणातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, संशोधन व कौशल्य विकासाला चालना देणे आणि उद्योगाभिमुख शिक्षणाला नवी दिशा देणे, या उद्दिष्टांसह विद्यापीठ कार्यरत राहणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यास शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









