राजापूर, दि. २१ (प्रतिनिधी) : बा. ल. साठे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय देवाचे गोठणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथे शुक्रवार दि. २० ऑक्टो. व शनिवार २१ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेमध्ये सरस्वतीपूजन सोबत शारदीय ज्ञानसत्र अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने आयोजित करण्यात आली.
जी. एम. शेट्ये हायस्कूल बसणी ता. रत्नागिरी येथील सहा. शिक्षक श्री. पी. एस. नाईक यांचे ‘संवेदनशीलता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून संवेदनशीलता या मूल्याविषयी विद्यार्थ्याशी संवाद व चित्रफित दाखवून वर्गामध्ये व जीवनामध्ये संवेदनशीलता जपणे कसे महत्वाचे आहे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अमर मोहनराव घाटगे यांचेही ‘शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानातून त्यांनी आधार, आकार आणि स्वप्नांची पेरणी या मुद्द्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना समजेल अशा सहज सोप्या भाषेतून कविता, कथा व स्तेय या लघुपटाच्या माध्यमातून समजावून सांगितले.
दोन्हीही व्याख्यानांना विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सदर प्रसंगी संस्था पदाधिकारी, प्राचार्य श्री. महाले नंदू पंडित, सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता अकरावीतील विद्यार्थी कुमार शिवप्रसाद नारकर याने सूत्रसंचालन केले व साहिल राऊत याने आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.








