रत्नागिरी, दि. ३ : कोकण आता मागे राहणार नाही. मुंबई, पुणे, नागपूरच्या पंक्तीत उभे राहणार आहे. महामार्ग, ग्रोथ सेंटर्स, पर्यटन हब आणि उद्योग प्रकल्पांच्या माध्यमातून कोकणाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी येथे जाहीर केला. “हे केवळ रस्ते नाहीत, हा कोकणाच्या भविष्याचा मार्ग आहे. रोजगार, उद्योग आणि समृद्धी थेट गावागावात पोहोचवणारा हा विकासाचा मार्ग आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साळवी स्टॉप परिसरात झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणासाठी ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेतला. सागरी मार्ग आणि कोस्टल रोडच्या कडेला उभारण्यात येणारी ११ ग्रोथ सेंटर्स ही कोकणाच्या अर्थव्यवस्थेची नवी इंजिने ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्रांमुळे हजारो तरुणांना रोजगार मिळेल आणि नोकरीसाठी गाव सोडण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मत्स्य उद्योग, काजू, नारळ, आंबा प्रक्रिया उद्योगांना विशेष पॅकेज देऊन स्थानिक उत्पादकांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. कोकणाच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनासाठी पूर्ण उपयोग करून ‘ग्लोबल व्हिलेज’ संकल्पना राबवली जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. बीच कनेक्टिव्हिटी, पर्यटन हब, रिसॉर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स आणि स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन देऊन कोकणाला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
दाभोळ खाडीवरील पूल, पानंद रस्ते, ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. एमएसआरडीसीमार्फत रस्ते, सागरी मार्ग आणि कोस्टल कनेक्टिव्हिटीला गती देण्यात येत असून, त्यामुळे उद्योग व पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
“आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, तर कोकणाच्या भविष्याचा आहे. आम्ही घोषणा करून थांबत नाही, प्रकल्प जमिनीवर उतरवतो,” असे सांगत शिंदे यांनी महायुती सरकारचा विकासाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीत महायुतीची सत्ता आल्याशिवाय हे प्रकल्प पूर्ण ताकदीने राबवता येणार नाहीत, असे सांगून त्यांनी मतदारांना थेट आवाहन केले.
रत्नागिरी जिल्ह्याचे कौतुक करताना ते म्हणाले, “हा जिल्हा केवळ रत्नांची खाण नाही, तर देशाला भारतरत्न देणारी भूमी आहे. कोकण हा कष्टकरी आणि लढवय्या माणसांचा प्रदेश आहे.” रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ३२ पैकी २९ जागा महायुतीने जिंकल्या, याचा उल्लेख करत त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रात ३० लाख कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली असून, यातील अनेक उद्योग कोकणात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “कोकणातील तरुणाला कामासाठी गाव सोडावे लागू नये, हेच आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री असताना राबवलेल्या योजनांचा आढावा घेताना त्यांनी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटीत ५० टक्के सवलत, शेतकरी सन्मान योजना आणि पीक विमा योजनेचा उल्लेख केला. शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपयांची मदत दिल्याचे सांगत, “शेतकरी हा अन्नदाता आहे. संकटात सरकार त्याच्या पाठीशी उभे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
लाडकी बहीण योजनेवर बोलताना ते म्हणाले, “ही योजना कधीच बंद होणार नाही. निवडणुकीपुरती नाही, तर दर महिन्याला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.” महिलांसाठी मॅमोग्राफी व कॅन्सर तपासणी मोहीम, जनआरोग्य योजनेची मर्यादा वाढवणे आणि हजारो बालहृदय शस्त्रक्रिया केल्याचा आढावा त्यांनी दिला.
सभेच्या शेवटी त्यांनी उपस्थितांना आवाहन करत सांगितले, “धनुष्यबाण आणि कमळाला मत म्हणजे विकासाला मत. आपल्या गावाच्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी योग्य बटण दाबा आणि रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा फडकवा.”
या सभेला उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, शिवसेनेचे पदाधिकारी, उमेदवार तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.







