गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, नागरिकांना खबरदारीचे आवाहन

संगमेश्वर, दि. ७ (अमृतराव जाधव) : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून धरणातून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता गडनदी धरण भरून वाहू लागले. त्यावेळी धरणाची पाणीपातळी १२१.२० मीटर होती. तर ५ जुलै २०२६ रोजी नोंदविलेल्या आकडेवारीनुसार धरणाची एकूण पाणीपातळी १२२.२० मीटर, एकूण पाणीसाठा ६६.८५१३ दशलक्ष घनमीटर आणि उपयुक्त पाणीसाठा ६६.५३९३ दशलक्ष घनमीटर इतका आहे. धरण क्षेत्रात ५ ते ६ जुलैदरम्यान सकाळी ८.३० वाजेपर्यंत १०३ मिमी पावसाची नोंद झाली असून, चालू हंगामातील एकूण पर्जन्यमान ९९४ मिमी इतके झाले आहे.

धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीपात्रातील पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विनाकारण नदीपात्रात जाऊ नये, शेतकरी वर्गाने शेतीची कामे करताना विशेष दक्षता घ्यावी तसेच जनावरांना नदीकाठी नेणे टाळावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीतील प्रवाहात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून धरण पूर्ण भरल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. दुसरीकडे, धरण भरून वाहत असल्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, धरण परिसरात किंवा सांडव्याजवळ जीव धोक्यात घालून जाणे, पाण्यात उतरणे अथवा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा चिपळूण पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने दिला आहे.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यास सांगितले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा