गुहागर समुद्रात तीनजण बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

गुहागर, दि. २७ : ख्रिसमस सुट्टी आणि वर्षअखेरीच्या पर्यटनासाठी गुहागर येथे आलेल्या पर्यटकांपैकी तीनजण समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दोघांना जीवरक्षक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले असून, एका पर्यटकाचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाला. अमोल मुथिया (वय ४२, रा. मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाचे नाव आहे.

मुंबईहून आलेले पर्यटक गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. सुरुवातीला परिस्थिती सामान्य होती; मात्र अचानक समुद्रातील प्रवाह तीव्र झाल्याने तिघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले. आरडाओरड ऐकून आजूबाजूला उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत कोणतीही सुरक्षा साधने नसताना थेट समुद्रात उड्या मारून बचावकार्य सुरू केले. जीव धोक्यात घालून त्यांनी तिघांनाही बाहेर काढले.

या घटनेत अमोल मुथिया यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या हृदयद्रावक घटनेमुळे समुद्रकिनारी शोककळा पसरली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वारंवार सूचना, इशारे व धोक्याचे फलक लावूनही काही पर्यटक समुद्रातील प्रवाहाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे.

आणखी वाचा