गुहागर विधानसभा मतदार संघातून आरपीआय आठवले गटाचे केंद्रीय संघटक संदेश मोहिते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

गुहागर, दि. २८ (प्रतिनिधी):  गुहागर विधानसभा मतदार संघातून आरपीआय आठवले गटाचे केंद्रीय संघटक संदेश मोहिते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे केंद्रीय संघटक आणि कोकणातील नेते स्व. ॲड. दयानंद मोहिते यांचे सुपुत्र संदेश मोहिते हे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले  आहेत. गुहागर विधानसभेसाठी आज मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती श्री. मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, त्यांच्या या बंडखोरीचा महायुतीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता असून महाविकास आघाडीचे उमेदवार आ. भास्करशेठ जाधव यांच्यासमोरही त्यांचे मोठे आव्हान असणार आहे.
आरपीआय (आठवले) पक्षाचे केंद्रीय संघटक संदेश  मोहिते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीतील मित्र पक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. प्रत्येक निवडणुकीत आरपीआय आठवले पक्षाचे महायुतीला सहकार्य लाभते. लोकसभेतही प्रामाणिकपणे पक्षाने काम केले. पक्षाचे अध्यक्ष, ना. रामदास आठवले यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मागणी होती. मात्र त्यांना केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद दिले गेले. विधान सभा निवडणुकीत महायुतीत घटक पक्ष असतानाही आरपीआय पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. हा पक्षावर झालेला अन्याय आहे. पक्षाचे आमदार, खासदार असेल तर विकासात्मक कामे करताना अडचणी येत नाहीत. यामुळेच आपण गुहागर विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचेही श्री. मोहिते यांनी यावेळी सांगितले.
गुहागर विधान सभा मतदार संघातून वडील स्व. ॲड. दयानंद मोहिते यांनी निवडणूक लढविली होती. या वेळी डॉ. विनय नातू यांच्यासमोर त्यांचा निसटता पराभव झाला. मात्र त्यानंतर आम्ही सातत्याने या भागात काम करत आहोत. जनतेचे प्रश्न, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतो. तरूणांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या हाताला रोजगार मिळावा, चिपळूण-गोवा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी व्हावा, येथील रस्ते, पाणी, विजेचा प्रश्न, शेतकरी, आंबा-काजू, नारळ, सुपारी बागायतदारांच्या अडचणी, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रासह विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. यामुळे जनतेने मला सेवा करण्याची एकदा संधी द्यावी, असे आवाहनही श्री. संदेश मोहिते यांनी केले.या वेळी महाराष्ट्र प्रदेश सदस्य संदीप मोहिते, तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, जिल्हा सरचिटणीस विद्याधर गमरे, शहर अध्यक्ष मंगेश जाधव, सरचिटणीस अमोल कदम, सहसचिव भूपेंद्र पवार, उपाध्यक्ष श्रीपत पवार, सल्लागार सुधीर गमरे, अशोक पवार, सदस्य प्रकाश गमरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा