इंदापूर, दि. २८ (प्रतिनिधी) : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेला न्हावी (ता. इंदापूर) येथील हरीश दिपक डोंबाळे याने राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश संपादन करून इंदापूर तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. ओडिशातील संबलपूर येथे झालेल्या ३० व्या राष्ट्रीय रोड रेस १०० किमी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेत हरीशने ज्युनिअर वयोगटातून देशात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच उत्तराखंडमधील रुद्रपुर येथे झालेल्या ट्रॅक स्पर्धेत टीम स्प्रिंट प्रकारातही त्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या दैदीप्यमान यशाबद्दल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे हरीश डोंबाळे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग, हरीशचे वडील दिपक डोंबाळे, आई आशा डोंबाळे, आजोबा तसेच न्हावी गावचे ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, सायकलिंग स्पर्धेत देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवून हरीशने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. हरीश हा इंदापूर तालुक्याचा अभिमान असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हरीशच्या यशाबद्दल त्याचे आई-वडील, आजोबा तसेच संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांचेही भरणे यांनी अभिनंदन केले. यावेळी सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले की, जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर हरीशने १०० किलोमीटर मास्टर्स सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचा नावलौकिक केला आहे. हरीशच्या या यशामुळे तालुक्यातील युवकांना नवी प्रेरणा मिळाली असून त्याच्या भविष्यातील यशासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








