रत्नागिरी, दि. १६ : भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, महानगर गॅस लिमिटेड तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांसाठी मोफत सहाय्यक उपकरणे देण्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १७ फेब्रुवारी (मंगळवार) व १८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी सामाजिक न्याय भवन, कुवारबाव (डी-मार्ट समोर), रत्नागिरी येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे.
या शिबिरात अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, कर्णबधीर, ९० टक्क्यांवरील अंध तसेच कुष्ट रोग निवारीत दिव्यांगांची तपासणी करण्यात येणार आहे. मात्र बौद्धिक अक्षम दिव्यांगांची या शिबिरात तपासणी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिबिरासाठी पात्र ठरण्यासाठी दिव्यांगांकडे UDID कार्ड (४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र), आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. रेशन कार्डावर वार्षिक उत्पन्न २ लाख ७० हजार रुपयांपेक्षा कमी नोंद असलेले किंवा संजय गांधी निराधार पेन्शन प्रमाणपत्र, तसेच खासदार, आमदार, सरपंच किंवा नगरसेवक यांचा उत्पन्न दाखला ग्राह्य धरला जाईल. तसेच मागील तीन वर्षांत त्याच प्रकारचे उपकरण अलिम्कोकडून घेतलेले नसावे आणि मागील पाच वर्षांत बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल किंवा स्मार्टफोनचा लाभ घेतलेला नसावा, अशी अट घालण्यात आली आहे.
तपासणीअंती पात्र दिव्यांगांना व्हीलचेअर, कुबड्या, एल्बो क्रचेस, वॉकिंग स्टिक, श्रवणयंत्र, स्मार्टफोन, ब्रेल किट, सीपी चेअर, बॅटरी ऑपरेटेड तीन चाकी सायकल, ADL किट आदी सहाय्यक उपकरणे देण्यात येणार आहेत. या उपकरणांमुळे दिव्यांगांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होऊन त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होणार आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी दिव्यांगांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, रत्नागिरी येथे ९८३४४४०२०० या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती सुनिता शिरभाते यांनी केले आहे. दिव्यांगांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
शिबिराचे वेळापत्रक पुढील प्रमाणे.
स्थळ:- सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, डी मार्ट समोर, रत्नागिरी.
दिनांक व वार:- 17/02/2026 मंगळवार व 18/02/2026 बुधवार
वेळ:- 10:00 ते 04:00
प्रकार:- 40% वरील प्रमाणित दिव्यांग.







