संगमेश्वर (कडवई), दि. ११ (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील कडवई गावातील सुकन्या पायल घोसाळकरने बिहारमधील लाखो कुटुंबांचे जीवन उंचावण्याचे काम जीविका प्रकल्पाद्वारे सुरू केले आहे. आपल्या “जीविका बेस्ड ऑन माय बिहार डायरीज” या लेखाद्वारे तिने आपल्या जीवनप्रवासाची प्रेरणादायी कहाणी सांगितली आहे.
सामाजिक कार्याची सुरुवात: कडवाईपासून बिहारपर्यंतचा प्रवास
पायलने कडवई येथे जन्म घेतला आणि शिक्षणाचा पाया शिवाजी विद्यालय कोसुंब हायस्कूलमध्ये घातला. देवरुखमधील आठल्ये सप्रे कॉलेज, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज, आणि अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगलोर येथे शिकत असताना तिच्या सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ झाल्या. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या प्रकल्पाद्वारे ईशान्य भारतात शेतकरी महिलांसाठी काम करत असताना तिच्या कार्याची दखल घेत बिहार सरकारने तिला जीविका प्रकल्पासाठी नियुक्त केले.
बिहारमधील सामाजिक आव्हानांना यशस्वी उत्तर
बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात पायलने आपल्या कामाची सुरुवात केली. जातीयवाद, गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्यांवर मात करत तिने पहिल्याच वर्षी ३० हजारांहून अधिक शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. आज ती बिहारच्या पाटणातील मंत्रालयातून काम करत असून, तिचे उद्दिष्ट २ लाख कुटुंबांना सक्षम बनवण्याचे आहे.
कोकणातील सामाजिक कार्यातून महाराष्ट्राच्या तरुणींना प्रेरणा
पायल घोसाळकर सुप्रसिद्ध भजन सम्राट राजू घोसाळकर यांची कन्या आहे. भजन, जाखडी, नमन, ऑर्केस्ट्रा, बेंजो, जलसा, कव्वाली यांसारख्या संगीतप्रकारांवर तिचे प्रभुत्व आहे. तिने भजनाच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, लेकीची सुरक्षा, पाणीसंवर्धन, आणि कोकणातील जमिनींचे संवर्धन यांसारख्या मुद्द्यांवर समाजप्रबोधन केले आहे. तिचे ध्येय आणि कार्यप्रवृत्ती कोकणातील तरुणींना प्रेरणा देणारी ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पायलच्या कार्याची दखल
पायलच्या कामाचे महत्त्व ओळखून अनेक देशांतील पाहुण्यांना बिहारची स्थिती समजावून देण्याचे काम तिच्याकडे आले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या पथकाने तिच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी तिला महाराष्ट्रात आणण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु जीविका प्रकल्पाची व्यवस्था नसल्याने ती बिहार सोडू शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेली पायल बिहारसारख्या दूरच्या प्रदेशात आत्मविश्वासाने कार्यरत आहे. तिच्या धाडसी कार्यामुळे कोकणात तिचे नाव आदराने घेतले जाते. बिहारमधील लाखो लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या कोकणकन्या पायल घोसाळकरला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.