कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन : जगातील पहिली ‘भाषेला समर्पित’ अर्ध मॅरेथॉन ४ जानेवारीला रत्नागिरीत

रत्नागिरी, दि. १२ : नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी, ४ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी धावपटूंच्या उत्साहाने पुन्हा निनादणार आहे. सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वासाठी यंदा देशातील ३०० हून अधिक शहरांमधून आणि १२ राज्यांतून तब्बल २२०० फिटनेस टुरिस्ट रत्नागिरीत दाखल होणार आहेत. जगात पहिल्यांदाच एखादी अर्ध मॅरेथॉन संपूर्णपणे मराठी भाषेला समर्पित केली गेल्याचा अभिमानही यावेळी व्यक्त करण्यात आला.

हॉटेल सी फॅन्समध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले की, मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त मराठी संज्ञांचा वापर केला जाणार असून फक्त अत्यावश्यक ठिकाणीच इंग्रजी शब्द असतील. २० डिसेंबर ही नोंदणीची अंतिम तारीख असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

सुवर्णसूर्य फाउंडेशनने मागील ३० दिवसांत ४००० किमी प्रवास करत राज्यभरातील धावपटूंना या उपक्रमाची माहिती दिली. मुंबई रोड रनर्सच्या ऑडिटमध्ये ही मॅरेथॉन कोकणाची क्रमांक १ रेटेड स्पर्धा ठरल्याचे अभिमानाने जाहीर करण्यात आले.

या उपक्रमाला उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मराठी भाषा विभाग, बँक ऑफ इंडिया, ऍड प्लस, एनर्जाल, जोशी फूड्स, रत्नागिरी हॉटेल असोसिएशन आदी संस्थांचे सहकार्य मिळाले आहे. परदेशातील धावपटूंनाही आभासी सहभाग देण्यासाठी आर्यक सोल्युशन्सतर्फे विशेष ॲप विकसित केले जात आहे.

मॅरेथॉनचा २१ किमी एकदिश मार्ग, आंब्याच्या आकाराचे आकर्षक मेडल, ९ गावांतून जाणारा जैवविविधतेचा अनुभव, आणि शेवटी समुद्रकिनारी मिळणारा उकडीचा मोदक ही यावर्षीची खास आकर्षणे असणार आहेत. याशिवाय अंकिता पाटकर यांचे झुंबा सत्र आणि ‘आयपॉपस्टार’ फेम राधिका भिडे यांनी संगीतबद्ध केलेले अधिकृत गाणेही सादर होणार आहे.

सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी ‘व्हिजन २०४७’ मांडताना पुढील २२ वर्षांत १ कोटी फिटनेस टुरिस्ट कोकणात आणण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

ऑफलाइन नोंदणीची सोय आनंद सागर अपार्टमेंट, मजगाव रोड येथील मॅरेथॉन कार्यालयात उपलब्ध आहे. पत्रकार परिषदेला विविध संस्थांचे प्रतिनिधी व सुवर्णसूर्य फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

कोकणवासीयांनी आपल्या भाषेसाठी आणि फिटनेस संस्कृतीसाठी आयोजित केलेल्या या अनोख्या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.

आणखी वाचा