चिपळूण, दि. ३० (अनिल फाळके) : कोकण रेल्वे कर्मचारी वृंदा आयोजित गणेशोत्सवानिमित्त खेर्डी येथील श्री विठ्ठल प्रासादिक तरुण मंडळ, खेर्डी यांनी कोकणातील पारंपरिक जाखडी नृत्यकला सादर केली. या लोकनृत्याच्या तालावर रेल्वे प्रवासी व कर्मचारी वर्गांनी मनसोक्त आनंद लुटला.
चिपळूण रेल्वे स्टेशन येथे झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात मंडळाने शक्ती तुरा नृत्याचा थरारक आविष्कार सादर केला. देऊळवाडीतील तरुणांनी अप्रतिम नृत्याबरोबरच गायकीचेही कौशल्य दाखवले. त्यांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत भरभरून दाद दिली.
रेल्वे प्रवासी तसेच कर्मचारी वर्गणींनीही या कार्यक्रमाचे कौतुक केले. मंडळातील कलाकारांच्या मेहनतीला व कलागुणांना कोकण रेल्वे कर्मचारी वृंदाकडून विशेष शुभेच्छा देण्यात आल्या.
कोकण रेल्वेच्या उपक्रमातून झालेल्या या गणेशोत्सव सोहळ्याने पारंपरिक कलांना प्रोत्साहन मिळालं असून, स्थानिक कलावंतांना आपल्या कलेचं दर्शन घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.









