लांज्यात उमेदवारी छाननीत १३ अर्ज अवैध; अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली

लांजा, दि. १९ (वार्ताहर): लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी झालेल्या अर्ज छाननीत एकूण १३ उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, या निर्णयामुळे आगामी निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या सात अर्जांपैकी एक अर्ज तर नगरसेवक पदासाठी आलेल्या ८० अर्जांपैकी तब्बल १२ अर्ज छाननीत बाद झाले.

नगरपंचायत येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका ढोले यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या प्रियांका संजय यादव यांनी दाखल केलेला पक्षीय अर्ज एबी फॉर्म जोडला नसल्याने अवैध ठरवावा लागला. मात्र, त्यांनी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी वैध राहिली आहे.
नगरसेवकपदाच्या छाननीतही अनेक उमेदवारांकडून एबी फॉर्म न जोडल्याने त्यांचे पक्षीय अर्ज बाद झाले. प्रभाग २ मधील ओंकार आंब्रे, प्रभाग ३ मधील श्वेता तरळ, प्रभाग ४ मधील अंजली कांबळे, प्रभाग ६ मधील प्रमोद कुरूप, प्रभाग ७ मधील शितल सावंत, प्रभाग १० मधील मेघा लांजेकर, प्रभाग १३ मधील अवंतिका सावंत आणि प्रभाग १४ मधील किशोर यादव यांचे भाजपमार्फत दाखल अर्ज अवैध ठरले. शिवसेनेकडून प्रभाग ८ मधील मंगेश लांजेकर व मिलिंद लांजेकर, तसेच प्रभाग १० मधील मधूरा लांजेकर यांचे अर्जही फॉर्म नसल्याने बाद झाले. काँग्रेसकडून प्रभाग ८ मधील सुजित भुर्के यांचाही अर्ज अशाच कारणावरून अवैध ठरविण्यात आला.

मात्र विशेष बाब म्हणजे, सर्व उमेदवारांनी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी वैध मानण्यात आली असून त्यामुळे अपक्ष म्हणून स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. एकूण १३ अर्ज अवैध झाल्याने लांज्यातील निवडणूक वातावरणात नवीन समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आणखी वाचा