चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून मनसे संपर्कप्रमुख श्री. श्रीपत शिंदे उतरणार रिंगणात ; २९ रोजी भरणार उमेदवारी अर्ज

देवरुख, दि. २४ (प्रतिनिधी) : सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलाच रंग चढू लागला आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि मनसेचे संपर्कप्रमुख, संगमेश्वर तालुक्यातील सुपुत्र, उद्योजक श्रीपत शिंदे निवडणूक रिंगणात उतरणार असून मंगळवारी २९ रोजी ते फॉर्म भरणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील सुपुत्र, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेले तसेच मुंबईस्थित उद्योजक आणि गेली अनेक वर्ष मनसेचे संपर्कप्रमुख म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत असलेले श्रीपत शिंदे हे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. श्री. शिंदे हे मंगळवारी २९ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. श्री शिंदे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्यामुळे आता रंगत चांगलीच वाढणार आहे.
उद्योजक तथा मनसे संपर्कप्रमुख श्रीपत शिंदे यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. काही ठिकाणी गावातील रस्ते स्वखर्चाने त्यांनी तयार करून दिले आहेत. त्यांचे सामाजिक काम अनेकांना परिचित आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे तालुक्यातील अनेकांनी स्वागत केले आहे.

आणखी वाचा