रत्नागिरी मराठा बिझिनेस फोरमच्या ‘हापूस’ चॅप्टरला MBF EP मा. राजेंद्र सावंत यांची सदिच्छा भेट

रत्नागिरी, दि. २ : मुंबई येथील सुप्रसिद्ध निर्माण ग्रुपचे चेअरमन MBF EP मा. राजेंद्र सावंत यांनी रत्नागिरी मराठा बिझिनेस फोरमच्या ‘हापूस’ चॅप्टरला सदिच्छा भेट दिली. ही भेट येथील हॉटेल विवा एक्सिकेटिव्ह येथे पार पडली. राजेंद्र सावंत यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी हापूस चॅप्टरचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र सावंत यांनी उद्योजकतेतील यशासाठी योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. व्यवसाय सुरू करताना किंवा व्यवसायाचा प्रवास योग्य दिशेने पुढे नेण्यासाठी एका मेंटॉरची साथ अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःचा विकास साधताना समाजातील होतकरू उद्योजकांनाही सोबत घेऊन पुढे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. आपला समाज इतर समाजांप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध व्हावा, यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे सावंत यांनी नमूद केले.

हापूस चॅप्टरने आतापर्यंत केलेल्या कामाचे कौतुक करत, पुढील काळात प्रगतीची दिशा कशी असावी, संघटनात्मक बळ कसे वाढवावे आणि नव्या व्यावसायिक संधी कशा निर्माण कराव्यात, याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या संवादातून उपस्थित उद्योजकांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या शेवटी हापूस चॅप्टरच्या अध्यक्षा ॲडव्होकेट कार्तिकी शिंदे यांनी राजेंद्र सावंत यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.

आणखी वाचा