संगमेश्वर, दि. ०२ : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे गेले अनेक वर्ष काम सुरू आहे. मात्र या महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. संगनेश्वर नजीक धामणी येथे मंगळवारी (दिनांक २ जानेवारी २०२४) दुपारी एकच्या सुमारास कंटेनर आणि डंपरचा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत.
भरधाव वेगाने एकमेकांवर आदळलेली वाहनांचे दृश्य होते काळजाचा थरकाप उडविणारे पण काही वेळा अचंबित घटना घडतात तशी घटना घडली आणि दोन्ही वाहनामधील तिघेजण सुदैवाने बचावले. सोनू सखाराम गौतम हा आपल्या ताब्यातील कंटेनर ( MH04 HS 1067) घेऊन मुंबईहून गोव्याकडे जात होता. समोरून महामार्गाचे काम करणारा डंपर (MH46 BF 0959) चालक महंमद अन्सारी हा धामणी मार्गी येत होता. हा डंपर खडिने भरलेला होता. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणीजवळ आल्यावर कंटेनर आणि डंपरमधे जोराची धडक बसून अपघात झाला. ही धडक इतकी जोराची होती की, खडी भरलेला डंपर थेट रस्त्याच्या बाजूला खोल दरीत जाऊन कोसळला. तर कंटेनरच्या केबिनचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात दोन्ही चालकांसह एकजण गंभीर जखमी आहे. यामध्ये महंमद अजमुद्दिन अन्सारी हा अपघातामध्ये गंभीर जखमी असून सोलु सखाराम गौतम आणि महम्मद याकूब हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. जखमीना स्थानिकांच्या मदतीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून अधिक उपचार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजीत मोरे करीत आहेत.
दरम्यान महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस चंद्रकांत कांबळे,सतिश कोलगे,विनय मनवल, सिद्धेश आंब्रे,रोहीत पाटील यांनी घटना स्थळी धाव घेटली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपघात स्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली.








