मुंबईत पत्रकारावर मारहाणी; पोलीस अधिकारीविरोधात चौकशी होणार

मुंबई, दि. १५ (क्षितिज कदम): गणपती विसर्जनाच्या वार्तांकनादरम्यान साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे यांना पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी मारहाण केल्याप्रकरणी पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच आणि इतर पत्रकार संघटनांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली.

पत्रकार संघटनांनी आयुक्तांना या घटनेची माहिती दिली आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. आयुक्त भारती यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत, पोलीस निरीक्षक नाईक यांची डीसीपीकडून विभागाअंतर्गत चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पत्रकार आणि पोलीस यांच्यातील नाते नेहमी सलोखाचे असावे आणि भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांना निर्देश दिले जातील.

या भेटीत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, ज्येष्ठ पत्रकार विनोद राऊत, पत्रकार विकास मिरगणे तसेच क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष मनिषकुमार पाठक आणि शाहीद अन्सारी सहभागी होते.

मिरगणे यांच्यावर पोलीसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध राज्यभरातील पत्रकार संघटनांकडूनही होत आहे. पत्रकार संघटनांनी यावर त्वरित कारवाई होण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पत्रकार सुरक्षेची हमी मिळू शकेल.

आयुक्त भारती यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि पोलीस प्रशासनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले असून, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर कठोर भूमिका घेतली जाईल असे स्पष्ट केले.

आणखी वाचा