मुंबईकरांमध्ये सायक्लोथॉन 2025 चा उत्साह; पर्यावरण व आरोग्य जपण्यासाठी सायकलिंगला मोठा प्रतिसाद

मुंबई, दि. ३० : रविवारी सकाळी बीकेसी परिसर उत्साहाने दुमदुमला होता. पर्यावरण संवर्धन, हवेची गुणवत्ता सुधारणा आणि फिटनेसविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई सायक्लोथॉन 2025’ मध्ये यंदा तब्बल सहा हजारांहून अधिक सायकलिस्टनी सहभाग नोंदवला. ही सायक्लोथॉन सलग चौथ्या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडली. 2022 साली आयर्नमॅन स्पर्धा जिंकून फिटनेस जगतात आपली वेगळी छाप पाडणारे आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती. वाढत्या प्रदूषणामुळे खालावणारा हवेचा दर्जा आणि दृष्यमानता पाहता सायकलिंग हा भविष्यकालीन सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

यंदाच्या सायक्लोथॉनमध्ये विविध अंतर आणि वयोगटांसाठी वेगवेगळे गट ठरवण्यात आले होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांचा उत्साह लक्षणीय दिसून आला. अभिनेता सुनील शेट्टीने विशेष हजेरी लावत सर्वांना फिटनेसचे महत्त्व पटवून दिले. मुंबईकर आता आरोग्याविषयी अधिक जागृत झाले आहेत आणि चालणे-सायकलिंग यांसारख्या नैसर्गिक व्यायामांना ते मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. कुटुंब एकत्र असेल तर मानसिक आरोग्यही सुस्थितीत राहते आणि सायकलिंगसारखे व्यायाम यात मोठी मदत करतात, असेही त्यांनी नमूद केले.

स्पर्धकांनी स्पर्धेबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. ठाण्याहून आलेल्या एका युवकाने प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल वापरण्याचे आवाहन करत २५ किमीचा टप्पा पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त केला. वाहतुकीचे उत्तम नियोजन झाल्याचे अनेकांनी सांगितले. एका महिलेनं पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंग मोठा आधार असल्याचे मत व्यक्त केले तर दुसऱ्या तरुणीनं वाढत्या एक्यूआय पातळीमुळे प्रशासनाने अधिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

पहाटेच्यावेळी बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते सायक्लोथॉनचा फ्लॅग ऑफ करण्यात आला. स्पर्धेच्या शेवटी सायकलिंगशी संबंधित एका विशेष पोस्टल स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले. यंदाच्या सायक्लोथॉनचे मुख्य उद्दिष्ट पर्यावरण संवर्धनाबरोबरच उत्तम मानसिक आरोग्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे होते. एमपावर या संस्थेच्या अध्यक्ष परविन शेख आणि त्यांच्या टीमने संपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली.

सायकलिंगचे मानवी शरीरावर होणारे फायदेही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहेत. 18 ते 30 आणि 65 ते 80 वयोगटातील 72 व्यक्तींवर झालेल्या अभ्यासानुसार, चार मिनिटांचे सायकलिंग व्यायाम वाढत्या वयाची चिन्हे टाळण्यात मदत करू शकतात. शॉर्ट बर्स्ट एक्सरसाइजमुळे शरीर तंदुरुस्त राहते, लठ्ठपणा नियंत्रित होतो आणि मधुमेहासारख्या आजारांपासूनही दूर राहण्यास मदत होते, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे. वर्कआऊटसाठी वेळ कमी मिळणाऱ्यांसाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळेच आजच्या पिढीसह वरिष्ठ नागरिकांमध्येही सायकलिंगची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसून येत आहे.

मुंबई सायक्लोथॉन 2025 ने पुन्हा एकदा सिद्ध केले की पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यास शहर तयार आहे आणि सायकल ही केवळ वाहतूक नव्हे तर आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण रक्षणाचा प्रभावी मार्ग आहे.

आणखी वाचा