पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया तर्फे महानिर्मितीला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. २७ : डेहराडून येथे पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय) तर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारंभात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महानिर्मिती) यांच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) विभागात राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तराखंड विधानसभेच्या अध्यक्ष मा. रितू खंडूरी भूषण आणि माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘नीशंक’ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने मांडलेल्या विकसित महाराष्ट्र २०४७ या व्हिजन डॉक्युमेंटच्या अनुषंगाने महानिर्मितीने व्हिजन २०३५ आखले असून, त्याअंतर्गत कंपनीची स्थापित वीज निर्मिती क्षमता ३२ गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारप्राप्त फिल्ममध्ये महानिर्मितीची सध्याची स्थापित क्षमता, प्रगतीपथावर असलेले प्रकल्प, भविष्यातील नियोजित प्रकल्प तसेच अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा मांडण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना अंतर्गत सौर प्रकल्प, उदंचन जलविद्युत प्रकल्प, हरित हायड्रोजन प्रकल्प, तरंगते सौर प्रकल्प, पर्यावरणपूरक उपक्रम तसेच गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी यांचा समावेश या माहितीपटात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही फिल्म ओसाका (जपान) येथे होणाऱ्या वर्ल्ड एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यासाठी जपानी टायटल्ससह तयार करण्यात आली आहे.

महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागातर्फे श्री. संतोष पुरोहित यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी. (भा.प्र.से.), संचालक (संचलन) श्री. संजय मारूडकर, संचालक (प्रकल्प) श्री. अभय हरणे, संचालक (वित्त) श्री. मनेष वाघिरकर तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाने जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले आहे.

या पुरस्कार सोहळ्याला पीआरएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सचिव डॉ. पी. एल. के. मूर्ती, श्री. एस. पी. सिंग, गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप गुप्ता तसेच पद्मश्री डॉ. बी. व्ही. के. संजय यांची उपस्थिती होती.

आणखी वाचा