मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी): माणसाचं मन हे फार चंचल असते. जन्मल्यापासूनच त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असते. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात कारण विचार करणं हे कित्येकदा त्याच्या हाताबाहेर गेलेले असते. असंख्य विचारांनी आपले मन कायम गुंतलेले असते. एखाद्या घराची खिडकी किंचित उघडी असेल तर त्या डोकावून पाहण्याचा मोह भल्याभल्यांना होतो त्यामुळेच आत्मचरित्राचा वाचक वर्ग खूप मोठा आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालले आहे हे पाहणे जर इतकी स्वभाविक वृती असेल तर माणूस समोर असता त्याच्याशी संवाद करणे हेही तितकेच स्वाभाविक आहे. जिथे आपल्याच माणसाच्या मनाचा थांग आपल्याला लागत नाही तिथे दुसऱ्याच्या मनात डोकावून बघणे अधिकच कठीण बाब होऊन बसते. दुसऱ्याच्या मनाचा कप्पा किंचित किलकिला करणे साध्य होतेच असं नाही. मनाची अस्वस्थता मग ती आपली असो व इतर कुणाची, वैयक्तिक कारणाने असो वा आणखी कुठल्याही, ती संवादान दूर होऊ शकते आणि सकारात्मक काही घडू शकतं असा सूर विद्या निकम यांच्या ‘अस्वस्थ मनाचे पडघम’ ह्या सार्थ शीर्षक असलेल्या ललित लेखसंग्रहात मांडले आहे. विद्या निकम ही प्रतिभेचा तिसरा डोळा लाभलेली लेखिका असून तिने तिच्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे , आलेल्या अनुभवांचे ,सूक्ष्म निरीक्षण करून – सोप्या रसाळ लेखन शैलीचा कोलाज या ललित लेख संग्रहातून मांडला आहे असे गौरवोदगार श्री . अच्युत गोडबोले यांनी काढले .
श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान आणि अष्टगंध प्रकाशन यांच्या सयुक्त विद्यामाने दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सुरेंद्र गावस्कर सभागृहात विद्या निकम यांच्या ‘अस्वस्थ मनाचे पडघम ‘या ललित लेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी आपले विचार मांडले. ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, सिने नाट्य दिग्दर्शक कुमार सोहनी आणि महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या सचिव, कवयीत्री डॉ. मीनाक्षी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अच्युत गोडबोले पुढे असेही म्हणाले की, ललित लेखांमधील लेखिकेला भेटलेली स्त्री पात्रे लक्षवेधी आहेत .बाईचा उपजत शहाणपण आणि तिचं आत्मभानदेखील अधोरेखित करते. जीवनातला साधेपणा, जिवंतपणा, सहजता टिकवण्याकरीता संहाराला सर्जनता हेच उत्तर आहे अशी चिकिस्तक स्वतंत्रदृष्टी लेखिकेला गवसली आहे. वाचताना ,बघतांना आणि जगताना आलेले अनुभव लेखिकेच्या मनपटलावर पडघम वाजवू लागतात आणि त्याचे पडसाद वाचकांच्या मनावर उमटविण्यात लेखिका यशस्वी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.
विद्या निकम आपल्या भाषणात म्हणाल्या की, मनातील घुसमट, मनाची होणारी तगमग यास कुठेतरी वाट करून द्यावी असे वाटले तर त्यात काही वावगे नाही. आणि ही अस्वस्थता असल्यामुळेच तर लिहिणे होते. ते ललितकथा आणि कवितेमधून कायम राहील याचीही खात्री आहेच.
श्री. कुमार सोहनी व डॉ. मीनाक्षी पाटील यांनी दोन्ही पुस्तकांचे तौलनिक मूल्यमापन केले. प्रकाशक श्री संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. तर श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता मोरे यांनी आभार मानले सौ. सीमा सावंत यांनी प्रकाशन सोहळ्याचे यथोचित सूत्रसंचालन केले.








