रत्नागिरी, दि. ३१ :- नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या बी.एस.सी. हॉस्पिटॅलिटी स्टडिज (हॉटेल मॅनेजमेंट) विभागातर्फे रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘विलुप्त कोकण’ या संकल्पनेवर आधारित थीम डिनर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात कोकण नमन कलामंच, रत्नागिरी प्रस्तुत “नमन चाललं लंडनला” हा संगीतमय करमणुकीचा कार्यक्रम होणार असून, त्यासोबतच कोकणातील आजकाल दुर्मिळ झालेल्या पारंपरिक पाककृतींचा आस्वाद घेण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळी यांनी केले आहे.
विलुप्त कोकणी पाककृती या पारंपरिक, ऋतुनिष्ठ व सध्या क्वचितच तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांचा वारसा जपण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांनी “कोकणातील हरवलेल्या पाककृती” ही संकल्पना निवडली आहे. या थीम डिनरमध्ये कोकणातील प्रसिद्ध पण लोप पावत चाललेल्या पाककृती जसे की खांतोळी, किसमुर, तोंडांक, हुमण, कारवारी चिकन सुक्का, बांगडा उपकरी तसेच इतर शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम कोकणी संस्कृतीवर आधारित सजावटीत सादर करण्यात येणार असून, कोकणवासीयांसाठी ही एक आगळी-वेगळी खाद्य व मनोरंजनात्मक पर्वणी ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी विलुप्त कोकणी खाद्यपदार्थांचे नियोजन शेफ मेघना शेलार व त्यांच्या टीमतर्फे करण्यात येत आहे. तर पाहुण्यांना फूड सर्व्हिस देण्याची जबाबदारी प्रा. अथर्व खांडेकर व त्यांच्या टीमकडे सोपवण्यात आली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबळे व त्यांच्या टीमकडून करण्यात येत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी परिश्रमपूर्वक तयारी करत आहेत.
या उपक्रमास संस्थेचे चेअरमन मा. अभिजित हेगशेट्ये यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. ताराचंद ढोबळे – ७७१९८५१०२५
कु. रुद्र जाधव – ७८४०९९५३३३
कोकणातील हरवलेल्या चवींचा वारसा पुन्हा जिवंत करण्याचा हा उपक्रम रत्नागिरीसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक आणि खाद्य उत्सव ठरणार आहे.