राज्यातील बहुतांश भागात पुढील काही दिवस पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई, दि. २८ : राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून सातत्याने बदल होत असून उष्णतेसोबतच पावसाचेही आगमन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर ३० मार्च ते १ एप्रिल दरम्यान राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मागील काही दिवसांत राज्यात उष्णता आणि पावसाचा अनोखा संगम दिसून येत आहे. काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, पिकांवर संकट ओढवले आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. पुढील काही दिवसही असेच पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता असल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी उत्तर कोकणातील काही भागांत उष्ण व दमट हवामानाची नोंद झाली होती. काही ठिकाणी कमाल तापमानातही वाढ झाली होती. मात्र शनिवारी या तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे विदर्भातील अनेक भागांत तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाली असून अकोला येथे सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्यातील कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात २ ते ३ अंशांनी हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

रविवारी सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुठे आहे इशारा?
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत ३० मार्च रोजी पावसाची शक्यता आहे. तसेच ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांसाठी हवामान विभागाने ‘पिवळा इशारा’ जारी केला आहे.

मुंबईत उष्णतेत घट, पण उन्हाचा तडाखा कायम
मुंबईत शनिवारी उष्ण व दमट हवामानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले. कमाल तापमानातही घसरण झाली असली तरी दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा कायम होता. सांताक्रूझ येथे ३२ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यापूर्वी शुक्रवारी सांताक्रूझ येथे ३७.१ अंश सेल्सिअस तापमान होते, त्यामुळे तापमानात सुमारे ५ अंशांनी घट झाली आहे.

दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे तसेच पश्चिमी विक्षोभ या नैसर्गिक घटकांमुळे राज्यात हवामानात बदल होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. ३१ मार्चपासून पुढील दोन दिवस विशेषतः राज्याच्या अंतर्गत भागांत पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा