रत्नागिरी, दि. २४ : ग्रामपंचायत नाचणे, ता. रत्नागिरी अंतर्गत विविध युवा मंडळांच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. याच औचित्य साधून ग्रामपंचायत नाचणे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील उत्सव मंडळांसह आरोग्य शिबीराचे आयोजन केले. मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी विनम्र युवा नवरात्र उत्सव मंडळाच्या सहकार्याने, रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा यांच्या पाठिंब्याने हे शिबीर संपन्न झाले.
सदर शिबीरात शुगर तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी तसेच रक्तदान शिबीर आयोजित केला गेला. लहान मुलांसाठी अंगणवाडी व शाळांमध्ये रक्तगट तपासणी झाली, तर स्त्रियांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण पाहून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यासोबत आयुष्यमान भारत आणि आयुष्यमान वय वंदना कार्डांची योग्य कागदपत्रे पडताळणी करून नव्याने काढून देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन सरपंच श्री. ऋषिकेश भोंगले, उपसरपंच सौ. निलेखा नाईक, ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे कार्यकर्ते, आरोग्य केंद्र व सिव्हील हॉस्पिटल कर्मचारी, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांच्या सहकार्याने करण्यात आले. या आरोग्य शिबीराने नवरात्र उत्सवाच्या आनंदात नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले.