रत्नागिरी प्रभाग १० मध्ये प्रचाराला जोर; महायुती-मविआकडून भेटीगाठींवर भर

रत्नागिरी, दि. १३ : निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये पुन्हा एकदा प्रचाराला वेग आला असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी मतदारांशी थेट संपर्कावर भर दिला आहे. उमेदवारांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घराघरांत भेटीगाठी सुरू केल्याने शहरात पुन्हा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तांत्रिक कारणांमुळे प्रभाग क्रमांक १० मधील मतदान २० डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर लगेचच युती-आघाडीचे उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत.

महायुतीकडून या प्रभागात तिसऱ्या फेरीचा प्रचार सुरू असून, विठ्ठल मंदिर परिसरातून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी (ता. ११) पुन्हा एकदा महायुतीकडून प्रचाराला जोर देण्यात आला. महायुतीकडून भाजपचे राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर हे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

महायुतीने एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे चित्र दिसून आले, तर त्या तुलनेत महाविकास आघाडीचा प्रचार अधिक संयमी आणि वैयक्तिक भेटींवर आधारित असल्याचे जाणवत आहे. मविआकडून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन न करता थेट मतदार संवादावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक १० हा पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला मानला जात असल्याने महायुतीने हा प्रभाग टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. एकाच प्रभागात पुन्हा एकदा प्रचाराची संधी मिळाल्याने आणि १ डिसेंबरपूर्वीचे वीस दिवस तसेच त्यानंतर मिळालेले पंधरा दिवस असे मिळून सुमारे महिनाभराचा प्रचारकाळ उपलब्ध झाल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रभागातील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा न्यायालयाने अवैध ठरवले आहेत. या निर्णयाविरोधात दोन्ही उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रभागाचा अंतिम निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

आणखी वाचा