सावर्डे, दि. १७ : रत्नागिरीचे माजी खासदार, सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा, सावर्डे (ता. चिपळूण) येथे होणार आहेत.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी ‘घरात हवेच आजी-आजोबा’ आणि ‘सोशल मीडियाचे समाजावर होणारे परिणाम’ हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धकांना ५+२ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार असून स्पर्धा केवळ मराठी भाषेतच होईल. प्रत्येक शाळेतून जास्तीत जास्त दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३,००० रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २,००० रुपये, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
याच दिवशी सकाळी ११ ते १२ या वेळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘इतिहासातील स्त्री व आजची स्त्री’ आणि ‘संगणक साक्षरता – काळाची गरज’ हे निबंध विषय असणार आहेत. निबंध स्पर्धेतील पारितोषिकांचे स्वरूप वक्तृत्व स्पर्धेप्रमाणेच असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५,०००, ३,००० व २,००० रुपये, चषक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. निबंध स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य असून स्पर्धकांकडून स्पर्धास्थळीच निबंध लिहून घेतले जाणार आहेत.
दोन्ही स्पर्धांसाठी आयोजकांनी ठरवून दिलेल्या नियम व अटी लागू राहणार असून निबंधांची तपासणी तज्ज्ञ परीक्षकांमार्फत केली जाणार आहे. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमात, त्यांच्या स्मारकस्थळी सावर्डे येथे पार पडणार आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक शाळांनी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या शैक्षणिक कार्याला आदरांजली वाहावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








