नवी दिल्ली, दि. १४ : लडाखमधील प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या विरोधात लावण्यात आलेली राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत नजरकैद रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने जवळपास सहा महिन्यांनंतर त्यांची जोधपूर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून वांगचुक यांची नजरकैद तात्काळ उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेह जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २६ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी वांगचुक यांना एनएसए अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून ते जोधपूर मध्यवर्ती कारागृहात होते.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार १७० दिवसांनंतर वांगचुक यांची सुटका करण्यात आली. जोधपूर येथील रतनदा पोलीस ठाण्याचे अधिकारी दिनेश लखावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातून बाहेर आल्यानंतर वांगचुक हे आपल्या खाजगी वाहनाने निघून गेले. सुरुवातीला ते दिल्लीला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र त्यांनी तत्काळ विमान प्रवास केला नाही.
गृहमंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, लडाखमधील विविध समुदाय नेते आणि भागधारकांशी सरकार सातत्याने संवाद साधत आहे. प्रदेशातील लोकांच्या अपेक्षा आणि चिंता समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अलीकडील आंदोलन आणि बंदमुळे विद्यार्थ्यांपासून ते पर्यटन व्यवसायापर्यंत अनेक घटकांवर परिणाम होत असल्याचेही सरकारने नमूद केले.
सरकार लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असून सर्व भागधारकांशी रचनात्मक संवाद सुरू ठेवला जाईल, असेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले. लडाखसंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती प्रक्रियेसह विविध व्यासपीठांवर चर्चा सुरू राहील, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, लेह एपेक्स बॉडी (LAB) चे अध्यक्ष छेरिंग दोर्जे लार्कुक यांनी वांगचुक यांच्या सुटकेचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे त्यांच्या चळवळीची भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. लडाखसाठी राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीअंतर्गत संरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी लेह एपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स एकत्रितपणे आंदोलन करत आहेत.
लडाखमधील पर्यावरण संवर्धन, हिमालयीन परिसंस्थेचे रक्षण आणि स्थानिक लोकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे सोनम वांगचुक यांची अटक देशभर चर्चेचा विषय ठरली होती. आता केंद्र सरकारने त्यांच्यावरील एनएसएची कारवाई मागे घेतल्याने लडाखमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणातही नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








