महाडच्या चवदार तळ्यासाठी ३०० कोटींचा आराखडा तयार करा; संसदेत सुनील तटकरे यांची मागणी

नवी दिल्ली, दि. ०९ : ऐतिहासिक चवदार तळ्याचा आगामी शताब्दी वर्ष सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने ३०० कोटी रुपयांचा विशेष विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत मांडली.

महाड येथे २० मार्च १९२७ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह पार पडला. अस्पृश्यतेविरुद्ध आणि पाणी हक्कासाठी झालेल्या या आंदोलनाने सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिला. याच सत्याग्रहाला २० मार्च २०२७ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असून या शताब्दी वर्धापनानिमित्त केंद्र सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

या ठिकाणाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेता स्मारक विकसित करणे, परिसराचा सर्वांगीण विकास करणे, पर्यटन सुविधा उभारणे तसेच जागतिक स्तरावर या आंदोलनाची गाथा पोहोचवण्यासाठी विशेष प्रकल्प राबविणे गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सभागृहात नमूद केले.

शंभराव्या वर्षाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहावे, अशीही त्यांची विनंती होती. महाडातील या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि सामाजिक परिवर्तनाचे हे केंद्र जागतिक पातळीवर अधोरेखित व्हावे, यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन तटकरे यांनी केले.

आणखी वाचा