साकव ग्लोबल फाउंडेशन टीमने घेतली पद्मश्री भिकू रामजी ईदाते यांची सदिच्छा भेट

रत्नागिरी, दि. ०७ : आज, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी साकव ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने पद्मश्री भिकू रामजी ईदाते (दादा) यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीत संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांवर चर्चा करत पुढील कार्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी पद्मश्री ईदाते यांच्यासह साकव ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिलीप जाधव, उपाध्यक्ष समीर सुभाष आंब्रे तसेच कार्यवाहक अक्षय नितीन आंब्रे उपस्थित होते.

भेटीदरम्यान ईदाते यांनी आपल्या शैक्षणिक जीवनापासून समाजकारणातील प्रवासाचा थोडक्यात आढावा देत विविध अनुभव शेअर केले. त्यांच्या मार्गदर्शनातून सामाजिक कार्यात सातत्य आणि बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित झाले.

साकव ग्लोबल फाउंडेशन गेल्या तीन वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण, पर्यावरण, महिला स्वास्थ्य, महिला सक्षमीकरण तसेच सेंद्रिय व शाश्वत शेती या क्षेत्रांत कार्यरत असल्याची माहिती संस्थापक अभिजीत जाधव यांनी दिली.

वाढत्या शहरीकरणामुळे तरुणांचा खेड्यांकडे होणारा कमी होत चाललेला ओढा लक्षात घेता, त्यांना पुन्हा गावाकडे आकर्षित करण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवत असल्याचे उपाध्यक्ष समीर आंब्रे यांनी स्पष्ट केले. तसेच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यातील कामकाजाचा आराखडा सादर करताना संस्थेला आवश्यक असलेले मार्गदर्शन ईदाते यांनी दिले. तसेच येणाऱ्या अडचणींवर वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची ग्वाही त्यांनी दिली. नवीन पिढी समाजकार्यात पुढे येत असल्याचे कौतुक करत त्यांनी साकव ग्लोबल फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा