रत्नागिरी, दि. २३ : रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील पोलीस हेडक्वार्टर परिसरातील नगर परिषद शाळा क्रमांक १२ येथे नगरसेवक विजय खेडेकर व नगरसेविका सायली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात माजी नगरसेवक विकास पाटील, स्वीकृत नगरसेवक अभिजीत दुडये तसेच प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी शाळेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणात सहभाग घेतला. वृक्षांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देत भविष्यातही अशा सामाजिक आणि पर्यावरणविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.







