मुंबई, दि. २५ : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या महत्त्वाच्या बैठकीत ६० पैकी केवळ ३७ आमदार उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बैठकीदरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडीतील समन्वयाबाबत खंत व्यक्त करत, “महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत असे म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का?” असा सवाल उपस्थित केला.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार संजय राऊत, आमदार शशिकांत शिंदे आणि सतेज पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. आगामी पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणे, सभागृहात आणि सभागृहाबाहेर संयुक्त भूमिका घेणे तसेच घटक पक्षांमधील समन्वय वाढविणे यावर बैठकीत चर्चा झाली.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि अलीकडील पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर “जे गेले त्यांचा विचार न करता पुढील लढाईवर लक्ष केंद्रित करा,” असा संदेशही नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे समजते.
मात्र, बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते अनुपस्थित राहिल्याने विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. अनुपस्थित आमदारांमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, रोहित पवार, अभिजीत पाटील, विकास ठाकरे, संदीप क्षीरसागर आणि जयंत पाटील यांचा समावेश होता. जयंत पाटील हे वैयक्तिक कारणामुळे अनुपस्थित असल्याची माहिती मिळाली असली तरी इतर नेत्यांच्या गैरहजेरीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
आगामी काळात विधिमंडळ अधिवेशन, आंदोलने आणि जनसंपर्क कार्यक्रम संयुक्तपणे राबविण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केले. विरोधकांची एकी केवळ बैठकीपुरती मर्यादित न राहता ती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. शिवसेनेतील अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.








