रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या छताचा भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

रत्नागिरी, दि. ६ : मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील नूतनीकरण केलेल्या छताचा काही भाग रविवारी (५ जुलै) रात्री सुमारे १०.४५ वाजता अचानक कोसळला. सुदैवाने प्रवाशांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटना घडली तेव्हा परिसरात जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुरू होते. स्थानकातील रिक्षा स्टँड परिसरावरील छताचा भाग अचानक कोसळल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. छत कोसळत असल्याचे लक्षात येताच तेथे आसरा घेतलेल्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

रात्री उशिराची वेळ असल्याने स्थानकावर प्रवाशांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र हीच घटना दिवसा घडली असती, तर स्थानकावरील मोठी गर्दी लक्षात घेता गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता होती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे अलीकडेच कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पहिल्याच मोठ्या पावसात छताचा भाग कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, छत कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच परिसर सुरक्षित करून आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी वाचा