पाली/बेणसे, दि. १८ (धम्मशील सावंत): रायगड जिल्ह्यात शिंदे गटाच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला संघर्ष आता उघडपणे समोर आला असून, नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. खासदार सुनिल तटकरे यांनी दिलेली तुफानी प्रतिक्रिया आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडून सतत होणारे आरोप–प्रत्यारोप यामुळे रायगडातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
तटकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत शिंदे सेनेतील काही नेत्यांनी त्यांच्यावर अश्लाघ्य आणि गलिच्छ भाषेत टीका केली, एवढेच नव्हे तर त्यांच्या वडिलांनाही लक्ष्य केले. “कुणी गलिच्छ शिव्या दिल्या, कुणी बाप काढला… तरी मी संयम राखला. चार वेळा अपमान झाला, पण कधीच मी आघाडी किंवा युतीला तडा देईल असं काही वक्तव्य केलं नाही. महाडमध्ये तर अत्यंत खालच्या पातळीवर भाषा वापरली गेली. रायगडची जनता सुज्ञ आहे, ‘यह पब्लिक हे सब जाणती हे’,” असे तटकरे म्हणाले.
नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हालचालींबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, महाड, श्रीवर्धन आणि पेण येथे भाजपसोबतची युती कायम आहे आणि इतर ठिकाणांचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. रोहा नगरपरिषदेतील उमेदवारीबाबत ते म्हणाले की, पक्षाने वनश्री शेडगे यावर विश्वास ठेवून तिला संधी दिली असून, ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
शिवसेनेविषयी बोलताना तटकरे म्हणाले, “विरोधकांशिवाय मजा येत नाही. शिवसेनेने उमेदवार उभे केले याचा मला आनंद आहे. रोहेकरांनी आमच्या 40 वर्षांच्या कार्याला नेहमीच साथ दिली आहे. यावेळीही तशीच अपेक्षा आहे.” ‘रोहा बदलतोय’ या शिवसेनेच्या घोषवाक्यावर त्यांनी खोचक टीका करत सांगितले की, “बदललाय या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. कुणीतरी लिहून दिलेलं बोलणं सोपं असतं. ज्यांनी घोषणा केल्या त्यांनी त्यांच्या गावात काय बदल केलाय ते पाहावं.”
भरत गोगावले यांनी केलेल्या आरोपांना तटकऱ्यांनी थेट प्रत्युत्तर दिले. “ते सांगतात की लोकसभेला मी मदत केली नाही. पण महाड मतदारसंघातून मला साडे तीन हजार मते मिळाली आणि ते स्वतः 25 हजार मताधिक्याने जिंकले. मग कुणी कुणासाठी किती काम केलं हे आकड्यांतून स्पष्ट होतं. विरेश्वर देवाला मानता तर त्यांच्यासमोर जाऊन सत्य सांगा,” असे तटकरे म्हणाले.
पालकमंत्रीपदावरून महायुतीत वाद असल्याच्या चर्चांना उत्तर देताना ते म्हणाले की, त्यांनी रायगडसाठी अनेक वर्षे काम केले असून, जिल्ह्याच्या संस्कृती, इतिहास आणि विकासाशी त्यांचे भावनिक नाते आहे. “श्वास असेपर्यंत रायगडच्या सेवेसाठी काम करत राहीन,” असे त्यांनी सांगितले.
तटकऱ्यांच्या या कठोर प्रतिक्रियेनंतर रायगडातील महायुतीतील शिवसेना–राष्ट्रवादी वाद आणखी उफाळण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीत हा संघर्ष राजकीय पाडापाडीचे रूप धारण करणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.








