रत्नागिरी, दि. ५ : कोकणासह राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सोमवार, ६ जुलै रोजी शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
कोकणातील २७ प्रमुख नद्यांपैकी २३ नद्या अद्याप नियंत्रणात असल्या तरी रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा आणि पाताळगंगा तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रोह्यातील कुंडलिका नदी धोका पातळीपर्यंत पोहोचली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरीतील वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, सोनवी, कोदवली, मुचकुंदी आणि बावनदी या नद्यांवरही सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
चिपळूण शहरात वाशिष्ठी नदीचे पाणी बाजार पुलाला लागल्याने शहरावर पुन्हा एकदा पुराचे सावट गडद झाले आहे. चिंचनाका, भेंडी नाका, अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, नाईक कंपनीसह सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. महसूल, पोलीस, नगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राजापूर तालुक्यात अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अर्जुना नदीचे पाणी शहरातील जवाहर चौकात शिरल्याने एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. राजापूर-शिळ-गोठणे-दोनिवडे मार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून बंदरधक्का आणि गणेशघाट परिसरातही पाणी साचले आहे. ग्रामीण भागात झाडे कोसळणे, वीजवाहिन्या तुटणे आणि घरांचे नुकसान अशा घटना घडल्या आहेत. नाटे-बाणेवाडी व कातळी येथे घरांवर झाडे कोसळली असली तरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मदतकार्य करत असून नागरिकांना पुराच्या पाण्यातून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दापोली तालुक्यातही मुसळधार पावसामुळे जालगाव, विद्यानगर, समर्थनगर, साईनगर, चैतन्यनगर, गिम्हवणे आणि दुबळेवाडी परिसरातील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. टाळसुरे येथे पाण्यात अडकलेल्या दोन महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नगरपंचायत, महसूल विभाग आणि स्थानिक स्वयंसेवकांनी जेसीबीच्या साहाय्याने पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेतले आहे.
सततच्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्येही पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. ठाण्यातील भातसा, बारवी, मोडकसागर आणि तानसा, पालघरमधील धामणी व कवडास, रत्नागिरीतील गडनदी, अर्जुना व नातूवाडी, तसेच सिंधुदुर्गातील तिलारी, अरुणा, कोर्ले-सातंडी आणि देवघर धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा लक्षणीय वाढला आहे. काही धरणांतून नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला असून पूर नियंत्रण कक्ष परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.
मुंबईतही मुसळधार पाऊस आणि ताशी ७५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे मोठा फटका बसला. खराब हवामानामुळे मुंबई विमानतळाची धावपट्टी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. इंडिगोची चार उड्डाणे रद्द झाली, तर १३ विमानांचे मार्ग बदलण्यात आले. शहरात झाडे आणि फांद्या पडण्याच्या १४२ घटना घडल्या असून तीन जणांचा मृत्यू झाला. महानगरपालिकेच्या सुमारे दहा हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी काम सुरू ठेवले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी यंदाच्या हंगामात प्रथमच पात्राबाहेर पडली आहे. नदीची पाणीपातळी वेगाने वाढत असून ३९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सात रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून एनडीआरएफची तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या आणि इतर शैक्षणिक संस्थांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडसाठी रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि हवामान विभाग व प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल, पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची पथके पूर्णपणे सज्ज असून परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे.








