१७ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर; कोकणात मुसळधार सरींचा इशारा

पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; रत्नागिरीसह कोकणातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई, दि. १२ : मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीजवळ सक्रिय असलेल्या मान्सून ट्रफचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत असून, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने १७ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला असून, कोकण आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात १७ ऑगस्टपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता असून, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाट परिसरातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे घाटमार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता असून, मुंबईत पावसाची रिपरिप कायम राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात १७ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होणे, झाडे उन्मळून पडणे तसेच जुन्या किंवा कमकुवत बांधकामांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. घाट परिसरात दरडी कोसळणे आणि भूस्खलनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि वाहनचालकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा