रत्नागिरी, दि. २७ (प्रतिनिधी): सध्या राज्यभर विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले जात असतानाच बंडखोरीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तळकोकणातही ही बंडखोरी उफाळून आली आहे. राजापूर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र या दोन्ही उमेदवारांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनास लाड यांच्या बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजापूर मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असे त्यांनी जाहीर केले असून कॉंग्रेस पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म नक्की मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण माघार घेणार नसल्याचेही त्यांनी ठरवले आहे. राजन साळवी यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी असून काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी मी हे पाऊल उचललं आहे असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये राजापूरची जागा ठाकरे गटाला देण्यात आली असली तरीही, स्थानिक पातळीवर बेबनाव असल्याचे दिसत आहे. याचा थेट फटका मविआचे उमेदवार राजन साळवींना बसणार आहे.
2019 मध्ये लाड यांनी राजन साळवींना दिली होती कडवी लढत
राजापूरमध्ये 2019 मध्ये शिवसेनेचे राजन साळवी आणि अविनाश लाड यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये अविनाश लाड यांनी राजन साळवी यांना कडवी झुंज दिली होती. निसटत्या मतांनी राजन साळवी यांनी अविनाश लाड यांचा पराभव केला होता. त्यामुळे अविनाश लाड यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. ते या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ठाम आहेत. अविनाश लाड हे आधीपासून या मतदारसंघांसाठी इच्छुक आहेत मात्र मविआकडून ठाकरे गटाच्या राजन साळवी यांना उमेदवारी दिल्याने त्यांची निराशा झाली असून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘रिफायनरी’ मुद्दा: किरण सामंतांचे टेंशन वाढवणार
राजापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास, या मतदारसंघाचे गेली सलग तीन टर्म राजन साळवी यांनी प्रतिनिधित्व केले आहे. शिवसेना फुटीनंतर ही राजन साळवी हे उध्दव ठाकरेंच्या सोबत राहिले. काही महिन्यापूर्वी त्यांना एसीबीच्या चौकशींना सामोरे जावे लागले. तरीहि साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. ते कायम सोबत राहिले. त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा राजन साळवी यांना मिळण्याची शक्यता मोठी आहे. यासोबत रिफायनरी होय नये या स्थानिकांच्या भूमिकेलाही पाठिंबा दिला आहे याचाही फायदा साळवी यांना होऊ शकतो. तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे 2024 च्या लोकसभेकरिता उत्सुक असताना नारायण राणे यांना महायुतीकडून उमेदवारी दिली गेली होती. मात्र विधानसभेला राजापूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, किरण सामंत यांनी रत्नागिरी सोडून राजापूर मतदारसंघ निवडल्याने जनता स्वीकारणार का हा मोठा प्रश्न आहे. यासोबत सामंत बंधूंची भूमिका रिफायनरी समर्थनार्थ असल्याने सामंत यांना आधीपासून तेथील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यात कॉंग्रेसच्या अविनाश लाड यांनी बंडखोरी करण्याचे ठरवले आहे. राजन साळवी, किरण सामंत या दोघांनाही अविनाश लाड यांचं मोठं आव्हान असणार आहे. जर अविनाश लाड यांची समजूत घालण्यात कॉंग्रेस पक्षाला अपयश आले तर मात्र यावेळची निवडणूक चुरशीची व रिंगणातील बलाढय उमेदवारांना अत्यंत कठीण निवडणूक असणार आहे.