राजापूर पाचल मध्ये कलारंगतर्फे कला कार्यशाळा

राजापूर, दि. २४ (नितिश खानविलकर): कोकणातील तरुण कला प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कलारंग संस्थेने पाचल येथील श्री केदारलिंग मंदिरात एक प्रेरणादायी कला कार्यशाळेचे आयोजन केले. लांजा येथील उदयोन्मुख कलाकार सिद्धेश मनोहर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. त्यांच्या विशिष्ट शैली आणि शिकवण्याच्या सहज पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना रेखाटन, स्केचिंग आणि सर्जनशील अभिव्यक्ती याविषयी सखोल ज्ञान मिळाले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेला नवे वळण देण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवाद्वारे शिकण्याची संधी मिळाली.

कलारंगचे संस्थापक आर्किटेक्ट अनिकेत अशोक सक्रे, पाचल हायस्कूलचे कला शिक्षक सिद्धार्थ जाधव, कमर्शिअल आर्टिस्ट हेमंत लब्दे यांनी उपस्थित राहून मुलांना मार्गदर्शन केले. आर्यन अभय धावडे, प्रतीक्षा पांडुरंग ढवळे या विद्यार्थी स्वयंसेवकांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. पाचवी ते नववीतील २७ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. यादरम्यान निसर्गरम्य केदारलिंग मंदिरातील विविध देखावे मुलांनी रेखाटले.

स्थानिक कला, कलाकार आणि त्यांच्या कथा जगासमोर आणणे, कलाकारांना जोडणे आणि एक मजबूत, सर्जनशील समुदाय घडवणे यासाठी विविध उपक्रमातून कलारंग कार्यशील राहील असे आयोजक अनिकेत सक्रे यांनी सांगितले तसेच किशोरभाई नारकर आणि एकनाथ गुरव यांनी केदारलिंग मंदिराची जागा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच सरस्वती विद्या मंदिर पाचल हायस्कूल यांचे विद्यार्थ्यांना कला शिकण्यास प्रोत्साहन देऊन सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

आणखी वाचा