राजापूर रोड स्थानकातील प्रतीक्षालयाचे सिलिंग कोसळले; कोकणकन्या येण्यापूर्वी प्रवासी बाहेर पडल्याने अनर्थ टळला

राजापूर दि.२२ (आदित्य बाकाळकर): कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रोड रेल्वे स्थानकातील प्रवासी प्रतीक्षालयाचे सिलिंग मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने मुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस स्थानकात दाखल होण्यापूर्वी प्रतीक्षालयात थांबलेले सर्व प्रवासी प्लॅटफॉर्मवर गेल्याने मोठी जीवितहानी टळली.

घटनेनंतर स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सिलिंगच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याची तातडीने पाहणी करण्यात आली. मात्र, या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे स्थानकावरील बांधकामाचा दर्जा आणि देखभाल व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. कोसळलेले सिलिंग हटवून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले.

विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांतील ही दुसरी घटना आहे. शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांच्या खर्चातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राजापूर रोड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करण्यात आले होते. मात्र, काम सुरू असतानाच छप्पर कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळीही कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.

आता पुन्हा प्रतीक्षालयाचे सिलिंग कोसळल्याने विकासकामांच्या गुणवत्तेची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे. तसेच स्थानक परिसरातील सर्व इमारती आणि बांधकामांची सखोल तांत्रिक तपासणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा