रत्नागिरी, दि. ११ : कर सल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने सार्वजनिक विश्वस्त संस्थांच्या ऑडिटमधील ठरावीक व विशेष मुद्दे तसेच आयकर कायद्यातील तरतुदींविषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले तांत्रिक चर्चासत्र सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या संपन्न झाले.
हे चर्चासत्र ब्राह्मण सहाय्यक संघ, श्री विरेश्वर मंदिर परिसर, चिपळूण येथे सकाळी ९.३० ते दुपारी १.०० या वेळेत पार पडले. या चर्चासत्रात सीए मंदार गाडगीळ व सीए सुमेध करमरकर यांनी सार्वजनिक विश्वस्त संस्थांच्या ऑडिट प्रक्रियेमधील विविध तांत्रिक बाबी, आयकर कायद्याच्या तरतुदी तसेच अनुपालन करताना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर व उपयुक्त मार्गदर्शन केले.
सार्वजनिक व चॅरिटेबल ट्रस्टसाठी आवश्यक असलेल्या लेखापरीक्षण प्रक्रियेतील नियम, अहवाल सादरीकरणाची पद्धत, आयकर कायद्यातील नव्या तरतुदी, तसेच ट्रस्ट व्यवस्थापनात पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. या मार्गदर्शनामुळे अनेक विश्वस्तांच्या शंका दूर झाल्या.
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष रमाकांत पाथरे होते. यावेळी असोसिएशनचे सचिव ॲड. रविंद्र साळवी तसेच ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट श्री. शशिकांत काळे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात अशा प्रकारची तांत्रिक चर्चासत्रे सार्वजनिक संस्थांच्या कामकाजासाठी अत्यंत आवश्यक असून भविष्यातही अशी उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले.
चर्चासत्रादरम्यान सामाजिक व चॅरिटेबल संस्थांच्या विश्वस्तांनी आपले प्रश्न मांडले व तज्ज्ञांकडून त्यांचे समाधानकारक निरसन करून घेतले. या चर्चासत्राला विविध चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, चार्टर्ड अकाऊंटंट व ऑडिटर यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
उपस्थितांनी चर्चासत्रातून मिळालेल्या मार्गदर्शनाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. सार्वजनिक विश्वस्त संस्थांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता व कायदेशीर पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारचे चर्चासत्र अत्यंत उपयुक्त ठरते, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
या चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी सीए सुमेध करमरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर सल्लागार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.







