मुंबई, दि. २० : दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन कायमस्वरूपी बंद करून त्याच प्लॅटफॉर्मवरून दादर–गोरखपूर एक्सप्रेस सुरू करण्याच्या रेल्वेच्या निर्णयामुळे कोकणवासियांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उपनगरीय गाड्यांच्या वाढत्या वाहतुकीचा दाखला देत पॅसेंजर सेवा दिवा येथे स्थलांतरित करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी प्रत्यक्षात कोकणातील प्रवाशांचा महत्त्वाचा आणि स्वस्त पर्याय बंद करण्यात आल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
कोरोना महामारीनंतर दादर–रत्नागिरी पॅसेंजर सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. त्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा कोकणवासियांना होती. मात्र, त्या जागी दादर–गोरखपूर एक्सप्रेस सुरू करण्यात आली आणि आता ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाला मंजुरी दिल्याचे समजते.
दादर–रत्नागिरी पॅसेंजर ही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सेवा होती. मुंबई, उपनगर आणि पालघर जिल्ह्यातील हजारो प्रवासी गणेशोत्सव, शिमगोत्सव, दिवाळी, होळी यांसारख्या सणांच्या काळात या गाडीने प्रवास करत असत. विशेषतः पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी ही गाडी कोकणात जाण्याचा सर्वात सोयीस्कर आणि किफायतशीर पर्याय मानली जात होती.
गेल्या काही वर्षांपासून या गाडीच्या पुनरारंभासाठी कोकणवासियांकडून सातत्याने आंदोलने करण्यात आली. तसेच मध्य रेल्वेला वारंवार निवेदने देऊन ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्ष करून पॅसेंजर सेवा कायमस्वरूपी बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी अधिकच वाढली आहे.
दरम्यान, बाहेरील राज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्यांना मुंबईत स्थान देण्याचा रेल्वेचा कल असल्याची टीका होत आहे. कोकणातील प्रवाशांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून इतर राज्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांना मोठा फटका बसला आहे.
या निर्णयामुळे भविष्यात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना अधिक खर्च आणि गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. परिणामी, या निर्णयाविरोधात पुन्हा आंदोलन उभारले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
फोटो : news18marathi.com








