रत्नागिरीत सोमवारी डॉक्टर एक दिवसांच्या लाक्षणिक संपावर

१२० डॉक्टरांच्या ओपीडी सेवा बंद; अत्यावश्यक सेवा सुरूच, जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

रत्नागिरी, दि. १८ : डोंबिवलीतील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या राज्यव्यापी बंदच्या हाकेला प्रतिसाद देत रत्नागिरीतील डॉक्टर सोमवारी (२० जुलै) २४ तासांच्या लाक्षणिक संपावर जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १२० डॉक्टरांच्या ओपीडी सेवा बंद राहणार असून, आपत्कालीन आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मात्र सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयएमए रत्नागिरी शाखेने दिली आहे.

आयएमएच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत खासगी दवाखान्यांमधील नियमित तपासणी आणि ओपीडी सेवा बंद राहतील. डोंबिवलीतील घटनेमुळे राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “डॉक्टर सुरक्षित असतील तरच रुग्ण सुरक्षित राहतील. डॉक्टरांवरील हल्ला म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर झालेला हल्ला आहे.” वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, अश्लाघ्य भाषा आणि मारहाणीच्या वाढत्या घटनांमुळे डॉक्टरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रशासकीय अपयशाचे खापर डॉक्टरांवर फोडले जात असून, अशा घटनांमुळे वैद्यकीय व्यवसायाची प्रतिमा मलिन होत आहे. परिणामी, तरुणांमध्ये डॉक्टर होण्याबाबतही नकारात्मक भावना निर्माण होत असल्याची खंत आयएमएने व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर हल्लेखोरांवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई, महाराष्ट्र मेडिकेअर कायदा अधिक प्रभावी करणे, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था बंधनकारक करणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचाराविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’ धोरण लागू करणे आणि डॉक्टरांना सुरक्षित, सन्मानपूर्वक व निर्भय वातावरणात काम करण्याची हमी देण्याची मागणी आयएमएने केली आहे.

या सर्व मागण्यांचे निवेदन सोमवारी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असून, रुग्णांनी अत्यावश्यक नसलेल्या उपचारांसाठी पर्यायी नियोजन करावे, असे आवाहनही आयएमए रत्नागिरी शाखेने केले आहे.

आणखी वाचा