रत्नागिरी, दि. ३० : गेल्या पंधरा दिवसांपासून रत्नागिरी शहर व तालुक्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. गॅसअभावी अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून, त्याचा परिणाम कामगार आणि पर्यटकांवरही होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘हॉटेल लँडमार्क’ येथे झालेल्या जाहीर सभेत व्यावसायिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.
हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्येबाबत पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार ८० गरजू व्यावसायिकांची यादी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे केवळ २५ ते ३० जणांनाच सिलिंडर मिळाल्याने उर्वरित व्यावसायिकांमध्ये संताप वाढला आहे.
पुरवठा यंत्रणेतील गोंधळ आणि गॅस एजन्सीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. गॅस उपलब्ध नसल्याने काही व्यावसायिकांनी डिझेल शेगड्यांचा पर्याय स्वीकारला, मात्र पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने त्यांच्यासमोर नवे संकट उभे राहिले आहे.
आंबा आणि पर्यटन हंगाम जवळ आला असताना गॅसअभावी पर्यटकांना सेवा कशी द्यायची, असा सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केला. प्रत्येक हॉटेलला आठवड्याला किमान तीन सिलिंडर मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात दररोज सुमारे २०० सिलिंडरची गरज असताना दिवसाला केवळ एक सिलिंडर देण्यात येत असल्याने व्यवसाय चालवणे अशक्य होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना पुन्हा निवेदन देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. या सभेला हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उपाध्यक्ष उदय लोध, सचिव सुनील देसाई यांच्यासह शंभरहून अधिक व्यावसायिक उपस्थित होते. शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास हॉटेल व्यवसाय बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.








