रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणूक : शिल्पा सुर्वे विरुद्ध शिवानी माने

रत्नागिरी, दि. १७ (अंकुश कदम): रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे यांची तर महाविकास आघाडीकडून शिवानी माने यांची निवड करण्यात आली असून दोन्ही उमेदवार आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या शिल्पा सुर्वे या पालकमंत्री डॉ. उदय सामंत तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करतील. त्यांच्या नावाची घोषणा रात्री उशिरा होताच मारुती मंदिर परिसरात फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

दरम्यान महाविकास आघाडीत एकमत न झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून शिवानी माने यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असली तरी राष्ट्रवादी (शरद पवार गट) स्वतंत्र भूमिका घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. शरद पवार गटाकडून वहीदा बशीर मूर्तझा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने तिरंगी लढतीची शक्यता अधिक बळावली आहे.

नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला काल १६ नोव्हेंबर रोजी मोठा प्रतिसाद मिळाला. रविवारी विशेष मुभेमुळे नगरपालिकेच्या कार्यालयात दिवसभर उमेदवार, पक्षनेते, कार्यकर्त्यांची प्रचंड लगबग पाहायला मिळाली. दिवसाअखेर तब्बल २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी सर्वप्रथम आम आदमी पार्टीच्या सुस्मिता सुहास शिंदे यांनी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या मैदानात पहिले पाऊल टाकले.

दुपारी तीनपर्यंतच्या पक्षनिहाय आकडेवारीनुसार शिंदे गटाकडून १३, अपक्ष ११, ‘आप’ ७, भाजप ६, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ५ आणि प्रहार पक्षाकडून २ अर्ज दाखल झाले असून नगरसेवकांच्या ३२ जागांपुढे एकूण ४४ अर्ज दाखल झाल्याने लढत चुरशीची झाली आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये अस्मिता चवंडे, मैथिली मयेकर, अनिकेत वालम, सायमा नदाफ काझी, मंजुळा कदम, सरिता कदम आणि कामना बेग यांनी अर्ज भरले. उद्धव ठाकरे गटाकडून प्रसाद सावंत, राजश्री शिवलकर, साजीदखान पावसकर, अमित विलणकर आणि नाझनीन हकीम यांनी उमेदवारी दाखल केली. भाजपकडून नितीन जाधव, तर शिंदे गटाकडून जागृती पिलणकर, सायली पाटील, संतोष कीर आणि नाहिदा सोलकर यांनी अर्ज नोंदवला. ‘आप’च्या वस्ता खलील, वस्ता रेहाना, झारी रमीज, तमन्ना खान, रुक्साना नावडे, नफिसा मजगावकर यांच्यासह नगराध्यक्षपदासाठी सुस्मिता शिंदे यांनीही नामनिर्देशन दाखल केले.

दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी शिंदे गटाच्या उमेदवारीची दुसरी यादी जाहीर केली असून यात संतोष कीर, जागृती पिलणकर, सायली पाटील, नाहिदा सोलकर, इल्यास खोपेकर आणि प्रीती सुर्वे यांचा समावेश आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगरपालिकेत आणखी गर्दी वाढण्याची शक्यता असून नगराध्यक्षपदासाठी शिल्पा सुर्वे, शिवानी माने आणि संभवतः वहीदा मूर्तझा या तिघींमध्ये खरी तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरीतील निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून पुढील काही तासांत घडामोडींना अधिक वेग येणार आहे.

आणखी वाचा