रत्नागिरी, दि. ३० : नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांवरील अपिलांचे निकाल वेळेत न लागल्याने रत्नागिरी नगर पालिकेतील प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. त्यामुळे आता या प्रभागातील मतदान 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सुधारीत निवडणूक कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
प्रभाग 10 मधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा यांचे उमेदवारी अर्ज प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपातील त्रुटीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात दोन्ही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपिल केले होते. मात्र, 24 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने हे अपिल फेटाळून लावले. या प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यक्रमात विलंब निर्माण झाला आणि आयोगाने ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
आयोगाच्या सूचनेनुसार, प्रभाग 10 वगळता इतर सर्व प्रभागांची निवडणूक यापूर्वीच्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. मात्र, प्रभाग 10 साठी नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अंतिम उमेदवारांची यादी 11 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल.
नवीन वेळापत्रकानुसार, 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडेल, तर मतमोजणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. प्रभाग 10 साठी 4 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू होणार आहे.








