खड्डेमुक्तीला निवडणुका कारणीभूत? ; नागरिकांचा सवाल — हे काम आधी का नाही झाले?

रत्नागिरी, दि. १६ : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाला अचानक गती मिळाल्याचे चित्र स्पष्टपणे पहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांमध्ये आता एकच प्रश्न गुंजू लागला आहे — “निवडणुका जाहीर झाल्या नसत्या तर ही कामे सुरू झाली असती का?”

दिवसेंदिवस वाढणारा त्रास, अर्धवट पडलेले काँक्रीटीकरण आणि शहराचा विस्कळीत रस्तेआराखडा यामुळे रत्नागिरीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. अनेक रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली होती की वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कामाला वेग

परतीचा पाऊस लांबल्याने रस्ते दुरुस्तीस विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून म्हटले जात होते. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी काही आठवड्यांपूर्वी रत्नागिरी शहर खड्डेमुक्त करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी जाहीर केला होता. पाऊस ओसरताच आता या कामांना प्रत्यक्ष गती मिळताना दिसत आहे.

शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम सुरू असून राम आळीतील रस्त्यांचे काम सर्वात वेगात होत आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे विशेष मागणी केली होती. अखेर या मागणीला प्रतिसाद देत राम आळीतील डांबरीकरण सुरू झाले आहे.

काम सुरु झाले तरी नाराजी कायम

रस्त्यांची दुरवस्था वर्षभर कायम असतानाच कामे निवडणुका जाहीर झाल्यावरच सुरू होत असल्याने नागरिक प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहेत. शहरातील काँक्रीटीकरण अनेक ठिकाणी अर्धवट झाल्याने काही रस्ते अधिकच धोकादायक बनले आहेत.

निवडणूक तोंडावर असल्याने विकासकामांना अचानक वेग आल्याची चर्चा शहरात सर्वत्र रंगली असून नागरिक विचारत आहेत—
“जनतेचा आवाज ऐकायला निवडणुका येणंच आवश्यक का?”

पुढील काही दिवसांत आणखी रस्त्यांचे काम सुरू होण्याची शक्यता

नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही प्रमुख मार्गांची तपासणी पूर्ण झाली असून पुढील काही दिवसांत शहरातील आणखी रस्त्यांवर काम सुरू होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली ही कामे प्रत्यक्षात किती टिकाऊ असतील आणि पालकमंत्र्यांच्या ‘दोन महिन्यात खड्डेमुक्त रत्नागिरी’ या आश्वासनाची कितपत पूर्तता होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा